Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाशाळेच्या बाहेर विध्यार्थी करत असलेल्या उपदव्यापाला जबाबदार कोण ? शाळा की पालक...

शाळेच्या बाहेर विध्यार्थी करत असलेल्या उपदव्यापाला जबाबदार कोण ? शाळा की पालक…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहरातील गवळीवाडा विभागात असलेली एक मोठी आणि नावाजलेली शाळा सध्या शालेय उपक्रमापेक्षा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे . मागील काही महिन्यांपासून ही शाळा म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे विद्यामंदिर आहे की शाळेच्या नावाखाली येथे येऊन एकमेकांच्या उरावर बसून मारामारी करण्याचा आखाडा आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवस वगळता या शाळेच्या परिसरात रोजच्या रोज वेगवेगळे विद्यार्थी , वेगवेगळ्या कारणांनी आपापसात भिडण्याच्या घटना घडत आहेत.अनेक स्वप्न उराशी बाळगून पालक आपल्या पाल्याला जेंव्हा शाळा कॉलेजमध्ये पाठवतात तेंव्हा त्यांना अपेक्षा असते की आपल्या पाल्याने किमान उत्तम गुण घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे आणि आपले भविष्य सुरक्षित करावे . मात्र सकाळी शाळेत गेलेला आपला पाल्य शाळा सुटल्यावर सुरक्षित आपल्या घरी परत येईल की नाही ही काळजी पालकांना सध्या सतावत आहे.
आपल्या पाल्याचा घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून परत घरापर्यंतचा प्रवास म्हणजे पालकांसाठी जीवाला घोर लावणारा विषय ठरत आहे . त्याला कारणं देखील अनेक आहेत . आपण यासंदर्भात वारंवार ऐकतो , वाचतो , बघतो . मात्र त्यावर कोणीही काही बोलत नाही , कोणी पुढे येत नाही , पोलीस प्रशासन असो , शाळा प्रशासन असो किंवा कोणतेही प्रशासन असो , सर्व काही समोर घडत असतानाही डोळेझाक करून हात वरती करून मोकळे होतात . एखादी अनहोनी घटना घडली की मग मात्र तेव्हढ्यापुरते खडबडून जागे होण्याचे नाटक केले जाते परंतु काही दिवसांत पुन्हा तसेच वातावरण निर्माण होते.
या विद्यामंदिरात शिक्षणासाठी पंचक्रोशीतील विध्यार्थी येत आहेत. काही एस टी बसने प्रवास करतात तर काही रेल्वे व काही दुचाकी घेऊन येत आहेत. आपला पाल्य शाळेत जातो त्याला आपण सर्व सुविधा पुरवतो परंतु त्याला दुचाकी देताना त्याचा परवाना काढून देने ही पालकांची जबाबदारी आहे. दुचाकी वरून शाळेत जाताना काही उपदव्याप तर करत नाहीना, शाळेत सलग हजर असतो की नाही, अभ्यास वेळेवर करतो की नाही या गोष्टींकडे लक्ष देने पालकांची जबाबदारी आहे. शाळेतील शिक्षक हे प्रामाणिक पणे विध्यार्थी घडवत असतात परंतु शाळेच्या बाहेर जाऊन विध्यार्थी काय गुण उधळतो यावर शिक्षक अंकुश घालू शकत नाही.
विध्यार्थी हा जोपर्यंत शाळेत आहे तोंपर्यंत त्याची जबाबदारी ही शाळा प्रशासनाची असते आणि ती जबाबदारी आम्ही शिक्षक म्हणून प्रामाणिक पणे पार पाडतोय पण संपूर्ण विद्यालतील फक्त दोन चार मुले अशी असतात की ते शाळेबाहेर जाऊन हाणामारी सारखे उपदव्याप करतात आणि शाळेचे नाव खराब करतात. जर शाळा प्रशासनाने अशा विध्यार्थ्यांवर कारवाई केली तर त्यांचे भविष्य धोक्यात येईल आणि त्याचमुळे शाळेकडून अशा विध्यार्थ्यां शाळेतून रस्टिकेट केले जात नाही शाळेच्या याच जबाबदार पणाचा गैरवापर काही विध्यार्थी करत आहेत.
शाळेबाहेर घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी शिक्षक, पालक व पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घातल्यास या घटना कमी होतील असे व्ही पी एस विद्यालयाचे प्राचार्य दरेकर सर यांनी सांगितले असून आम्ही दर आठवडा महिनाभरात पालकांची बैठक आयोजित करतो परंतु अनेक पालक काही कारणास्तव पालक सभेला गैरहजर असतात मग त्यांना शाळेचे विषय, विध्यार्थ्यांचे विषय समजत नाही आणि शाळेच्या बाहेर विध्यार्थ्यांनी काही ही केले की दोषी शाळेला मानले जाते.
आमच्या विद्यालयात लोणावळा शहरातील अत्यंत नामांकित आणि अनेक मोठमोठी व्यक्तिमत्त्व घडली आहेत. शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असणारी ही शाळा सध्या काही विध्यार्थ्यांमुळे बदनाम होत असून. त्या विध्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकणार असल्याचेही प्राचार्य दरेकर यांनी सांगितले.
काल घडलेल्या प्रकाराची दखल घेत लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून एक कॉन्स्टेबल व एक होमगार्ड शाळेच्या आवारात देखरेखीसाठी ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले तर शाळेचे शिक्षक ही शाळा सुटण्याच्या वेळेत गेट बाहेर दांडके घेऊन उभे असलेले दिसत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page