Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशासनाचे दुट्टपी धोरण ,पुन्हा एकदा पावसाळ्यात पर्यटनावरील रोजगारावर कुऱ्हाड !

शासनाचे दुट्टपी धोरण ,पुन्हा एकदा पावसाळ्यात पर्यटनावरील रोजगारावर कुऱ्हाड !

१४४ कलम रद्द करा , सागरभाऊ शेळके यांची प्रशासनाकडे मागणी..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) एकीकडे पर्यटन वाढीसाठी करोडो रुपयांचा निधी राज्य शासनाकडून कर्जत तालुक्याला येत असताना पर्यटन क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करायचे तर दुसरीकडे पावसाळ्यात वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांवर सक्तीची बंदी घालायची , हा कुठला प्रकार शासनाने चालवला असून यावर नियोजनबद्ध उपाययोजना राबवून येथील नागरिकांच्या पावसाळी रोजगारावर कुऱ्हाड मारण्याचे काम करू नये , त्वरित १४४ कलम रद्द करावा , अशी संतप्त मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका युवक अध्यक्ष सागरभाऊ शेळके यांनी प्रशासनाकडे केली आहे.

कर्जत तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो . मागील सलग ५ वर्ष कर्जत तालुक्यामध्ये १४४ कलम लावला होता. मागील दोन वर्ष कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय योग्य होता, पण त्या अगोदरचे ३ वर्ष ही १४४ कलम लावण्यात आला होता. कर्जत तालुक्यात एम आय डी सी झोन नसल्याने रोजगाराची खूप मोठी समस्या आहे . त्यात दोन वर्ष कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत , व्यवसाय बंद पडले आहेत , असेच जर १४४ कलम दर वर्षी लावण्यात आले , तर कर्जत तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी होईल व कर्जतचा पर्यटन व्यवसाय बंद पडेल.
पावसाळ्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी व ट्रेकिंगला कर्जतला पसंती देतात . आषाणे , बेकरे , वदप , नेरळ , जुम्मापट्टी , सोलनपाडा , कोंढाणा लेणी , माथेरान, पेब व पेठ किल्ला पांडवलेणी , असे अनेक धबधबे , लेणी , पर्यटन स्थळे व ऐतिहासीक स्थळे आहेत . त्यामुळे तालुक्याला निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे , या पर्यटन स्थळावर अनेक छोटे मोठे दुकानदार , हॉटेल व्यावसायिक , ग्रामीण भागात घरगुती जेवण देणारे , खानावळ , वडापाव, भजी विक्रेते , हातगाड़ी वर चटपटीत मक्का विकणारे , चहा , कॉफ़ी विकणारे , सैंडविच वाले , पानटपरी , वाहन चालक , रिक्षाधारक असे अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत.

त्यात २ वर्ष लॉकडाउन , कोरोनामुळे अनेक लोकांचा व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर आलेत , नोकर वर्गाचा पगार देता येत नाही , बँकेचे हप्ते,रिक्षा ,टैक्सी,टेम्पो,याचे बँकेचे थकित राहिलेले हप्ते , कुटुंब , शिक्षण , घर चालवायचे कसे ? यात सर्व सामान्य माणूस अडकून गेलाय व कर्जबाजारी होऊन देशोधडीस लागला आहे.

म्हणूनच ग्रीन झोन व फार्महाऊस उदयास आलेल्या या कर्जत तालुक्यात एवढे सारे घटक पर्यटनावर अवलंबून असतील तर योग्य विचार व्हावा,पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यटन वाढीसाठी स्थानिक प्रशासनाने ग्रामपंचायत यांना सोबत घेऊन येणाऱ्या पर्यटकांकडून योग्य कर घेऊन , त्यातून त्यांच्या सुरक्षितेसाठी लाइफ गार्ड नेमावेत , कचरा व्यवस्थापन करावे , चेंजिंग रूम , टॉयलेट या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात , यातून स्थानिक युवकांना रोजगार निर्माण होईल . पर्यटकांना नियम व अटी लागु करावेत , त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटनात वाढ होईल,व स्थानिक बेरोजगारांना , निदान पोटा पुरता का होईना रोजगार निर्माण होईल.
त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी व रोजगार वाढीसाठी योग्य उपाययोजना करून प्रशासनाने सहकार्य व प्रयत्न करावेत , व कलम १४४ लागू करू नये , अशा मागणीचे निवेदन सागरभाऊ शशिकांत शेळके , (अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस,कर्जत तालुका ) यांनी मा. ज़िल्हाधिकारी – अलिबाग रायगड , प्रांतअधिकारी कर्जत , तहसीलदार कर्जत , dysp कर्जत ,पोलीस निरीक्षक – कर्जत याना देण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page