मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत .
संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरीनिमित्त खासदार बारणे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला आहे . संसदरत्न , महासंसदरत्न पुरस्काराने गौरविल्यानंतर यंदा ‘ संसद विशिष्ट रत्न पुरस्कार ‘ देऊन खासदार बारणे यांना गौरविण्यात येणार आहे.त्यामुळे मावळच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला आहे.
संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते . लोकसभेत महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न , सर्वाधिक चर्चेतील सहभाग, संसदेमधील उपस्थिती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने मागील सलग सात वर्षांपासून गौरविण्यात येत आहे.पाच वर्षे ‘ संसदरत्न ‘ , एकदा महासंसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते.आता यंदा ‘ संसद विशिष्ट रत्न पुरस्कार ‘ देऊन बारणे यांना गौरविण्यात येणार आहे.
बारणे यांच्यासह सुप्रिया सुळे , एन . के . प्रेमचंद्रन यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे . सतरावी लोकसभा सुरू झाल्यापासून 2021 मध्ये हिवाळी अधिवेशनापर्यंतच्या कामाची दखल या पुरस्कारांसाठी घेण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली.
खासदार श्रीरंग बारणे यांनी अर्थसंकल्प सत्रात 405 प्रश्न विचारले , 108 चर्चा सत्रात सहभाग घेतला . 7 खासगी विधेयके मांडली तर सभा कामकाजात 96 टक्के सहभाग घेतला .खासदार श्रीरंग बारणे म्हणाले , ” मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर सलग दोनवेळा विश्वास टाकला . त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी मी अहोरात्र काम करत आहे . मतदारसंघासह राज्यातील विविध प्रश्नांना संसदेत वाचा फोडली.
संसदेत विविध चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला . खासगी विधेयके मांडली.या कामाची मागील सात वर्षांपासून दखल घेतली जात आहे.मला सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला . माझ्या मावळ मतदारसंघातील जनतेने टाकलेल्या विश्वासामुळे हे सर्व शक्य झाले आहे .
नागरिकांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो आहे . संधीचा उपयोग नागरिकांसाठी करत आहे.हा सन्मान माझा नसून मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा आहे ” असल्याचे खासदार बारणे म्हणाले.