Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळाशिवीगाळीचा शेवट मृत्यूत; ठाकूरसाईत खूनाची थरारक घटना..

शिवीगाळीचा शेवट मृत्यूत; ठाकूरसाईत खूनाची थरारक घटना..

लोणावळा : दारूच्या नशेत आईबाबत अश्लील भाषेत बोलल्याच्या रागातून मित्राचा लोखंडी कुदळीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील ठाकूरसाई येथे घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत भाजे (ता. मावळ) येथील दिनेश लक्ष्मण गरवड (वय 36) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दिनेश याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर गरवड (वय 40) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपी प्रणव विश्वजित डेका (वय 18, रा. चव्हाण नगर, वडगाव मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना 3 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास कुबेर व्हिला या बंगल्याच्या माळी रूममध्ये घडली. आरोपी प्रणव व मयत दिनेश हे दोघेही बंगल्यात माळीकाम करत होते. दरम्यान, दारूच्या नशेत दिनेश याने आरोपी प्रणवला आईबाबत अश्लाघ्य शब्दात शिवीगाळ केली. त्यामुळे रागाने पेटलेल्या प्रणवने लोखंडी कुदळीने दिनेशच्या डोक्यात घाव घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिनेशचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे करत असून, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page