भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) बीड जिल्ह्यातील ” मस्साजोग ” गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या ही केवळ एक गुन्हा नाही, तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे. गावाच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या देशमुख यांना निर्दयपणे संपवलं जाणं ही क्रूर आणि संतापजनक घटना आहे. बीड जिल्ह्यात आपलं दहशतीचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या ” कुख्यात गुंड वाल्मिक कराडने ” अनेक निष्पाप नागरिकांपासून ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवकांपर्यंत सर्वांना धाकात ठेवलं. संतोष देशमुख यांच्या हत्येने त्याच्या अमानुष प्रवृत्तीचा कळस गाठला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र संताप व्यक्त केला जात असताना कर्जत-खालापूर मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीने आज बुधवार दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी कर्जतमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरले . यावेळी ” वाल्मिक कराडला भर चौकात फाशी द्या ” अशी ठाम मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांवर तातडीने ” फास्ट ट्रॅक कोर्टात ” खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना मोकळीक दिली, तर उद्या पुन्हा एखाद्या न्यायप्रिय माणसाचा बळी जाईल , यावर प्रकाश टाकत संपूर्ण शिवसेना आणि शिवसैनिक देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील , असे मत यावेळी मांडण्यात आले
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख सुदाम दादा पवाळी, तालुका संघटक शिवराम बदे, विभाग प्रमुख शिवाजी देशमुख, जिल्हा संघटक संभाजी शेठ जगताप, विभाग प्रमुख रत्नाकर बडेकर, विलास दादा मोडक, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, रवींद्र शिर्के, सरपंच नाथा आगज , सौ मानसी कदम यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यावेळी कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यात आले .