Friday, October 18, 2024
Homeपुणेसात महिन्याच्या बालकाचे अपहरण: पुणे लोहमार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अटकेत..

सात महिन्याच्या बालकाचे अपहरण: पुणे लोहमार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अटकेत..

प्रतिनिधी: श्रावणी कामत
पुणे – पुणे लोहमार्ग पोलिसांनी सात महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करून अपहरण झालेल्या बालकाची सुखरूप सुटका केली आहे. आरोपींमध्ये मोहम्मद खान कुरेशी (वय २७, रा. मली घाट, देवगड, राजस्थान) आणि नजमा अक्रम खान कुरेशी (वय २५, रा. सदर) यांचा समावेश आहे. त्यांनी १८ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून बालकाचे अपहरण केले होते.
फिर्यादी पूजा संतोष दास (वय २८, रा. चेनूर दुधकुंडी, पश्चिम सिंगभूमी, झारखंड) या आपल्या मित्रांसोबत रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेटजवळ बसल्या असताना आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून बालकाचे अपहरण केले. गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्पष्ट दिसत नव्हते, परंतु पोलिसांनी तांत्रिक तपास आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू ठेवले.
बालकाच्या शोधासाठी पोलिसांची विशेष कार्यवाही:
आरोपींनी पुणे रेल्वे स्टेशन ते स्वारगेट बस स्थानकापर्यंत एका रिक्षाचा वापर केला होता. तपास पथकाने ३७ रिक्षाचालकांची चौकशी केली. रिक्षाचालक आयाज शेख यांनी तपासात सहकार्य करून आरोपींची माहिती दिली. पोलिसांनी त्यानुसार आरोपींची रेखाचित्रे तयार केली आणि त्या आधारे तपास अधिक पुढे नेला.
तपास पथकाने विविध सीसीटीव्ही फुटेज तपासून, अहमदाबाद (गुजरात) येथे आरोपींचा माग लावला. पोलिसांनी २९ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपींना बालकासह अटक केली आणि १२ दिवसांनंतर बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, आरोपींनी गुन्हा करताना परिधान केलेले कपडे आणि फुटेजमधील अंधुक प्रतिमांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास यशस्वीपणे केला.
पोलिसांचे आवाहन:जनतेस आवाहन करण्यात येते की गर्दीच्या ठिकाणी लहान बालकांना मोकळे सोडू नये, तसेच अनोळखी व्यक्तींना विश्वास ठेवून त्यांच्याशी संवाद साधताना सावधगिरी बाळगावी. अपत्य नसलेल्या पालकांनी दत्तक योजना स्वीकारावी, ज्यामुळे बालकाला पालक मिळतील आणि दत्तक योजना यशस्वी होईल.
पोलिस तपास पथकाची कामगिरी :पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक इरफान शेख, पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी नरके, पोलिस उपनिरीक्षक सचिन नाझरे, पोलिस हवालदार सुनील कदम, पोलिस हवालदार अनिल टेके, पोलिस हवालदार आनंद कांबळे, पोलिस हवालदार निलेश बिडकर, पोलिस हवालदार अनिल दांगट, पोलिस अंमलदार विक्रम मधे, पोलिस अंमलदार नेमाजी केंद्रे, पोलिस अंमलदार सिध्दार्थ वाघमारे, पोलिस अंमलदार विकास केंद्रे, महिला पोलिस अंमलदार जयश्री ढाकरे, तांत्रिक विश्लेषण विभाग पोलिस हवालदार संतोष जगतपा, पोलिस हवालदार रुपेश पवार, पोलिस हवालदार अमित गवारी, पोलिस अंमलदार गवळी, स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे, छायाचित्रकार गिरीश चरवाढ आणि पोलिस अंमलदार शुभम देसाई (युनिट वन, पुणे शहर) यांचे अथक प्रयत्न आणि कौशल्यामुळे आरोपींना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आणि बालकाची सुरक्षित सुटका करण्यात आली.

- Advertisment -

You cannot copy content of this page