पुणे : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे येथे अँटी रॅगिंग सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग नियमावली आणि त्याचे पालन याबाबत जागरूक करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली चॅटरटॉन यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेचे महत्त्व पटवून दिले आणि कोणत्याही प्रकारचे बेजबाबदार वर्तन टाळण्याच्या सूचना दिल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत देशभरात राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने, सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हा सप्ताह २३ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक अधिष्ठाता कुमारी भाग्यश्री दशमुखे अध्यक्षस्थानी होत्या. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. २३ ऑगस्ट रोजी आंतर महाविद्यालयीन ई-पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे संयोजन सौ. सीमा गावडे यांनी केले. २६ ऑगस्टला इंटरनल क्वालिटी अॅश्युरन्स सेलचे समन्वयक श्री राघवेंद्र गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ई-घोषणा स्पर्धा घेण्यात आली. त्याचप्रमाणे, २७ ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्याचे संयोजन सहाय्यक अधिष्ठाता श्री पार्थ नाथ व कुमारी कल्पना जाधव यांनी केले.
विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या लोणावळा संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सहाय्यक अधिष्ठाता कुमारी भाग्यश्री दशमुखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वीणा तिवारी यांनी मानले.