चाकण : लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापिका भाग्यश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण येथील गो-चीज आणि मंचर येथील गो फार्म मिल्क डेअरी (पराग मिल्क फूड्स प्रायव्हेट लिमिटेड) ला औद्योगिक भेट दिली.
दिनांक २१ जानेवारी रोजी आयोजित या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगाशी प्रत्यक्ष परिचित करून देणे हा होता. या भेटीत विद्यार्थ्यांनी चीज उत्पादन प्रक्रियेबद्दल सखोल माहिती घेतली. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे विविध तंत्र, कच्चा माल, त्याचे सोर्सिंग, उत्पादनातील स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रण अशा सर्व टप्प्यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी विद्यार्थ्यांना डेअरी उत्पादनांबाबत माहिती देणारी व्याख्यानेही आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानांमधून त्यांनी उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधत अन्न उत्पादन आणि व्यवस्थापनाचे व्यावहारिक ज्ञान मिळवले. त्यामुळे सैद्धांतिक अभ्यासाला औद्योगिक क्षेत्राशी जोडण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.
प्रा. भाग्यश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या भेटीतून केवळ तांत्रिक माहितीच नव्हे, तर अन्न उद्योगाच्या व्यावसायिक पद्धतींबद्दलही ज्ञान मिळवले. प्राचार्या डॉ. अंजली चार्टटन यांच्या प्रोत्साहनामुळे ही औद्योगिक भेट यशस्वी झाली.
अशा भेटींमुळे विद्यार्थ्यांना अन्न उद्योगातील आव्हाने, संधी आणि तंत्रज्ञानाची व्यावसायिक माहिती मिळते, ज्यामुळे त्यांना भविष्याचे दरवाजे खुले होण्यास मदत होते. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक आणि व्यावहारिक विकासासाठी यापुढेही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.