लोणावळा : २२ एप्रिल वसंत व्याख्यानमाला समिती, लोणावळा यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत रविवारी पहिलं पुष्प गुंफण्यात आलं. या कार्यक्रमासाठी ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या संवादासाठी निवेदिका कु. अनघा मोडक यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
अनघा मोडक यांच्या ओघवत्या निवेदनशैलीतून मधुराणी यांचे जीवनातील विविध पैलू रसिकांसमोर उलगडत गेले. त्यांच्या मधाळ बोलण्याने आणि कवितांच्या जुगलबंदीने संपूर्ण सभागृह भारावून गेलं.
“आजची पिढी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाढते आहे, मात्र त्यांना भावनिक आधाराची गरज अधिक आहे. प्रत्येकाने स्वतःला शाबासकी देत पुढे जावं, स्वतःला आनंदात ठेवावं,” असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला. अरुंधतीच्या भूमिकेतील अनुभव शेअर करताना त्यांनी स्त्रीसाठी कौतुकाच्या थापेचं महत्त्वही अधोरेखित केलं.
मुलाखतीत त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी, पहिले नाटक, शालेय व कॉलेज जीवनातील अनुभव, आईने दिलेले संस्कार आणि अभिनय प्रवासातील अनेक क्षण शेअर केले. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी एक तराणा आणि एक गीत सादर केलं, तर वैभव जोशी, विंदा करंदीकर यांच्यासह इतर कवींच्या कविता जिवंत सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
या प्रसंगी कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके यांची विशेष उपस्थिती होती. तसेच व्याख्यानमालेच्या अध्यक्षा राधिका भोंडे, विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे आणि यंदाच्या व्याख्यानमालेच्या अध्यक्षा स्वरूपा देशपांडेही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील, परिचय उमा मेहता, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद देशपांडे यांनी केलं.