लोणावळा : स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने कैवल्य विद्यानिकेतन, तुंगारली येथे देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेली अंतरशालेय गीतस्पर्धा दिमाखात पार पडली. रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत शहरातील सात प्रमुख शाळांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सुमधुर व गगनभेदी आवाजात सादर झालेली देशभक्तीपर गीते उपस्थितांना अक्षरशः भारावून टाकणारी ठरली.
स्पर्धेच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रम स्थळी देशभक्तीच्या गाण्यांचे स्वर दुमदुमत असताना वातावरण देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेले होते. ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा झाली. मुला-मुलींनी उत्तम तयारी, आकर्षक वेशभूषा आणि सुंदर मांडणीद्वारे आपले सादरीकरण रंगतदार बनवले.
५ वी ते ७ वी गटात सिंहगड पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. अंतर भरती बालग्राम स्कूलला द्वितीय तर यजमान कैवल्य विद्यानिकेतनला तृतीय क्रमांक मिळाला. तर ८ वी ते १० वी गटात कैवल्य विद्यानिकेतनने पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला. गुरुकुल हायस्कूलला दुसरे आणि ॲड. भाऊसाहेब भोंडे स्कूलला तिसरे स्थान मिळाले. याशिवाय ओव्हरऑल कॉनसोलेशन विशेष बक्षीस रायवुड इंटरनॅशनल स्कूलला प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून ख्यातनाम संगीत शिक्षणतज्ज्ञ, गीतकार व गायक सुनिल कोपरकर आणि ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक चंद्रकांत जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे आणि गाण्यांमधून झळकलेल्या देशभक्तीच्या भावनेचे विशेष कौतुक व्यक्त केले.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून PSI अनिल केरूळकर उपस्थित होते. तसेच रोटरी क्लबच्या अध्यक्षा विजया कल्याण, सचिव मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, तस्नीम, ब्रिंदा गणत्रा, नितीन कल्याण, धुरिया रामपुरवाला, वैशाली साखरेकर, नारायण शेवाळे, दिलीप पवार, जयवंत नलावडे, नंदू कडू, कॉन्स्टेबल अंकुश पाटील यांसह अनेक मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ लोणावळा आणि कैवल्य विद्यानिकेतनचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले.