Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडहालीवली व किरवली येथे रेल्वे कामाच्या होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांच्या घरांना तडे !

हालीवली व किरवली येथे रेल्वे कामाच्या होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांच्या घरांना तडे !

भरपाई न मिळाल्यास मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्था करणार आमरण उपोषण , अध्यक्ष अंकुश सुरवसे यांचा ईशारा..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) इरशाल वाडी – चौक येथील दरड भूस्खलन घटनेने अनेक निष्पाप जीवांचा अंत झाल्याने या घटनेमुळे आता सर्वत्र घबराट पसरली आहे . कर्जत शहराच्या जवळच किरवली – हालिवली या गावाशेजारीच कर्जत – पनवेल या नवीन रेल्वे मार्गाचे काम डोंगरातूनच सुरू असून भोगद्यासाठी ब्लास्टिंगच्या कामामुळे येथील घरांना तडे गेलेले असून घरांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यास मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्था – हालीवली या विरोधात आमरण उपोषण करणार आहे , याबाबतीत मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अंकुश सुरवसे यांनी कर्जत नायब तहसीलदार सचिन राऊत यांना निवेदन देवून इशारा दिला आहे.

कर्जत शहराच्या नजीक हालीवली – किरवली गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरात रेल्वेचे कर्जत – पनवेल मार्गाचे काम सुरू आहे . या ठिकाणी रेल्वे बोगद्याच्या कामामुळे ब्लास्टिंगचे काम सुरू असून यामुळे या दोन्ही गावातील घरांना व इमारतींना जोराचे हादरे बसून तडे गेले आहेत . दिवसातून दोन वेळा हे ब्लास्टिंग होत असून आजपर्यंत अनेक ग्रामस्थांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

नुकतीच इरशालवाडी येथे दरड भूस्खलन होवून मोठी दुर्घटना घडली आहे , तर यापूर्वी देखील वावर्ले येथे अश्या ब्लास्टिंगमुळे दगड उडून मोटारसायकल चालविणारे यांना मार लागून मयत झाल्याची घटना ताजी असल्याने या गंभीर समस्येकडे त्वरित कर्जत तहसिल कार्यालयाने पहाणी करून घरांना गेलेल्या तडांचे व पुढील मोठी दुर्घटना होण्यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे , म्हणून वेळीच पावले उचलावीत , व झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी , अन्यथा या दुर्लक्षित कारभाराविरोधात मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल , असा संतप्त इशारा अध्यक्ष अंकुश सुरवसे यांनी आज कर्जत तहसिल कार्यालयात निवेदनाद्वारे दिला आहे.

कर्जत नायब तहसिलदार सचिन राऊत यांना निवेदन देते प्रसंगी यावेळी मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश सुरवसे , सचिव व प्रवक्ते शशिकांत उबाळे , गोरख सुरवसे , श्रेयस वाघमारे , विशाल सत्यवर्धन , निखिल ढोणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page