Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड"हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ",एक धगधगते ज्वलंत अग्निकुंड..

“हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे “,एक धगधगते ज्वलंत अग्निकुंड..

भिसेगाव-कर्जत( सुभाष सोनावणे ) देवास – देशास – धर्मास ज्याने संरक्षिले युक्ती बुद्धिबलाने , योजिले जो जीवन लोककाजी तो वंद्य आम्हास राजे शिवाजी ! या उक्तीप्रमाणे शतकाच्या यज्ञातून एक केशरी ज्वाला उठली आणि या देशासह महाराष्ट्राला वाघाचे नेतृत्व देऊन गेले . मराठी माणसाच्या स्वाभिमानाला डिवचणारे , निखाऱ्यावरच्या राखेवर फुंकर घालून चैतन्य जागविणारे , ……आवाज कुणाचा , मुंबई आहे महाराष्ट्राची ….नाही कुणाच्या बापाची , अशी सिंहगर्जना करणारे ” हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” हे या देशाला लाभलेले आगळे – वेगळे नेतृत्व ! सन १९६० च्या दशकात मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी पण पद्धतशीरपणे बहुभाषिक करून विविध कंपन्या , विमा कंपन्या , कॉर्पोरेट ऑफिस , सकाळच्या दुधवाल्यापासून ते रात्रीच्या पावभाजी , भेळपुरींच्या गाड्यांवर परप्रांतीय नागरिकांनी ताबा मिळवलेला ! नोकरीच्या ठिकाणी ” नो व्हेकेंसीचे ” बोर्ड वाचून मान खाली घालून आपल्या नशिबालाच दोष देत आत्मविश्वास हरवून बसलेला मराठी माणूस आपले पौरुषत्वच थिजून गेलेला होता . त्याचा ताठ असलेला कणा पार मोडून गेला होता , ” पिचल्या कण्याचा ” म्हणून त्याला हिणवले जात होते , अशावेळी शिडशिडीत बांध्याचा एक तरुण उभा ठाकला , ” वाचा आणि थंड बसा ” , अशी मार्मिक या पाक्षिकात सुरुवात करून त्याने मराठी स्वाभिमानाला डिवचले , आणि मराठी माणूस पेटून उठला , ” बजाव पुंगी – हटाव लुंगी ” अशी आरोळी ठोकत कडवट शिवसैनिक तयार केले . आपल्या ठाकरी भाषेने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आणि हा – हा म्हणता ही ” वाघाची डरकाळी ” संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचली . ” यंडूगुंडुचे ” मराठी माणसाच्या हक्कावरील आक्रमण परतवून लावण्यासाठी एका संघटनेची गरज होती.
मराठी माणसाला एकाच विचारात , एकाच ध्येयात गुंतवून ठेवण्यासाठी बाळासाहेब विचार करत असता , प्रबोधनकार म्हणाले , ” काय रे बाळ , काय संघटना काढायचा विचार आहे काय ? बाळासाहेब म्हणाले , हो ! ” मराठी माणसाचे सत्व जपणारी ” संघटना काढायची आहे , नांव काय द्यायचे , तो विचार करतोय , त्यावर प्रबोधनकार म्हणाले , मी सांगतो संघटनेचे नांव , ………” शिवसेना ” १९ जून १९६६ रोजी ” शिवसेना ” नावाचा सूर्य अखेर शिवतीर्थावर तळपला ! ……” जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो , भगिनींनो आणि मातांनो ” ………हे नेहमीचे परवळीचे शब्द ऐकूण समोरचा अथांग जनसागर मंत्रमुग्ध झाला . चैतन्याची एक लहर चमकून गेली , विजेचा लखलखाट , ढगांचा गडगडाट व्हावा , तसा टाळ्यांचा कडकडाट झाला.
शिवसेनाप्रमुख झिंदाबाद , हा आवाज आजपर्यंत कोणीही रोखू शकला नाही . ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत ५८ वर्षे ध्येयवेड्या शिवसैनिकांच्या कठोर परिश्रमातून अखंडपणे धगधगत ठेवणारे हे ” यज्ञकुंड ” आजही ज्वलंत आहे . मराठी मनाचा तारकमंत्र , हिंदुत्वाच्या रक्षणासाठी – मराठी अस्मितेसाठी , एकच लक्ष – एकच विचार – एकच नेतृत्व लाभलेले ” शिवसेनाप्रमुख ” यांच्या कार्याला अखेर देशाला – महाराष्ट्राला मानाने ” जय महाराष्ट्र ” करावाच लागेल !…….म्हणूनच म्हणतात ” सत्तेसाठी सतराशे साठ , हिंदूंसाठी एकच सम्राट ” …..बाळासाहेब- बाळासाहेब- बाळासाहेब ! ” कदम मॅन्शन ….ते ….मातोश्री हा त्यांचा प्रवास ” एक ज्वलंत ” चळवळच म्हणावी लागेल.
ज्यांच्या कपाळी भगवा टिळा लावला अशा अनेक शिवसैनिकांचे नशीबच बाळासाहेबांनी बदलवले . त्यांच्या हयाती नंतरही मर्द मावळ्या कडवट शिवसैनिकांच्या जोरावर ” शिवसेना ” हे ज्वलंत अग्निकुंड प्रखरतेने तळपत आहे . धन्य ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे ज्वलंत विचार ! त्यांच्या २३ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा जय महाराष्ट्र !!!
- Advertisment -

You cannot copy content of this page