नंदुरबार : हेरा इंग्लिश स्कूलच्या सभागृहात ईद मिलन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला सोमनाथ फिजिकल अकॅडमीचे अध्यक्ष व सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक (PSI) भास्कर सीताराम सोनवणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
ईदच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अकॅडमीतील सर्व विद्यार्थी तसेच मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात पाहुण्यांसाठी शिरखुरमा व पारंपरिक नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
आयोजक मुस्तकीम शेख, अब्दुल हफीज काझी आणि इकराम कादरी सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोनवणे सर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान भास्कर सोनवणे सर यांनी उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि बंधुतेचा संदेश दिला. ईद हा सामाजिक सलोखा आणि प्रेमाचा सण असून, एकमेकांशी सद्भावना जोपासण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.