लोणावळा शासनाच्या आदेशानुसार सलग पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनला लोणावळा शहरात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला व त्यासाठी लोणावळा पोलीस व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती खबरदारी ही घेतली. प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षे बाबत एवढे दिवस घेतलेली मेहनत कुठे तरी कमी पडत असल्याचे आज दोन दिवसानंतरही शहरात दिसून येत आहे. पाच दिवसाच्या लॉक डाऊन नंतर गुरुवार व शुक्रवारी सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जत्रा भरल्याप्रमाणे गर्दी केली होती.
भाजी मार्केट जणू गर्दीने उसळून चालले होते. त्यावेळी सर्व लोणावळेकरांना कोरोनाचा विसर पडल्याचे थरारक चित्र दिसत होते. आज अत्यावश्यक वस्तूंसाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ नागरिकांना कोरोनाच्या सावटापेक्षा मौल्यवान वाटू लागलेले दृष्य लोणावळा शहरात सर्वत्र दिसत होते. सध्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी असलेली 7 ते 11 वेळ अपुरी पडत आहे.
सगळ्याचा विसर पडून बाजारात झालेली नागरिकांची गर्दी त्यात नागरिकांना कोणतेही भान नसल्याचे निदर्शनास येत होते. अशा परिस्थितीत मात्र लोणावळा पोलीस व नगरपरिषदेचे कर्मचारी आपली भूमिका बजावत तोंडाला मास्क लावा, सामूहिक अंतर ठेवा, एका ठिकाणी जास्त गर्दी करू नका अशा सूचना ध्वनी यंत्रनेमार्फत देत शहर भर फिरत होते. त्यावेळी एक लक्षनीय चित्र दिसून आले की प्रशासन हे सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी करत आहे पण त्याकडे मात्र एकाही नागरिकाचे लक्ष नव्हते.
नागरिक मात्र 7 ते 11ह्या अवघ्या अपुऱ्या वेळेत खरेदी करण्यासाठी वढावढ करत होते. लोणावळा शहरातून व परिसरातील गावांमधून अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी शहरात येत आहेत त्यातच अवघ्या तीन तासात वस्तू खरेदी करणे म्हणजे बाजारातील वाढत्या गर्दीमध्ये जणू कसरतच आहे.त्यावेळी सोशल डिस्टंसिंगचे कोणालाही भान राहिले नव्हते वा प्रशासनाची भीती ही कोणाला नसल्याचे समजत होते.आणि सध्या रमजान चा महिना सुरु असून अनेक मुस्लिम बंधू भगिनी खरेदीसाठी बाजारात येत आहेत अवघ्या तीन तासात शहरातील सर्व नागरिक खरेदीसाठी येणे म्हणजे गर्दी होणे साहजिकच आहे.
बाजारातील वाढत्या गर्दी मुळे अनेक सुरक्षा व्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. गर्दीमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णांच्या वाढीमध्ये गती निर्माण होईल आणि त्यामुळे कोरोनावर मात करणे अधिक कठीण होईल.नागरिकांचे असे बेशिस्त वागणे थांबाविण्यासाठी प्रशासनाने सर्व बाबींचा पूर्व विचार करून अत्यावश्यक घटकांच्या वेळेत नियोजनबद्ध वाढ करणे गरजेचे आहे. एकाच वेळी नागरिक खरेदीसाठी गर्दी करणार नाहीत यासाठी लोणावळा नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने योग्य उपाययोजना राबवाव्यात.