लोणावळा (प्रतिनिधी): नौदलात कमांडंट अधिकारी असल्याची बतावणी करुन लोणावळा परिसरातील मुलांना आय.एन.एस शिवाजी, लोणावळा येथे नोकरीस लावण्याचे अमिष दाखवुन त्यांच्याकडून प्रत्येकी 3 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया नौदल अधिकाऱ्यास लोणावळा पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
याप्रकरणी ऐश्वर्या कृष्णा लेंडघर (रा. भांगरवाडी, लोणावळा ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून याप्रकारणी आरोपी आकाश काशिनाथ डांगे (वय 28, रा. भाडाळी बु. ता. फलटण ) आणि त्याचे दोन साथीदार जयराज आनंदराव चव्हाण व अभय सेवागिरी काकडे (दोघे राहणार झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा ) यांच्यासह त्यांच्याकडील ह्युंदाई व्हेरना कार क्र. MH 42AR 2005 ही मोटार कार एक नौदलाचा ड्रेस, नौदलाची नेमप्लेट, शिक्के, राजमुद्रा असलेली गाडीची नंबर प्लेट व इतर साहित्य असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी आकाश डांगे याच्या विरोधात भादवी कलम 420,170,171,467,468,471,34, शासकीय गुपिते कायदा 1923 चे कलम 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, सहाय्यक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार जयराज पाटणकर, पोलीस शिपाई शेखर कुलकर्णी, विरसेन गायकवाड,मनोज मोरे यांनी आय. एन. एस शिवाजी लोणावळा नेव्हल पोलीस यांच्या मदतीने ही कारवाई केली.
फिर्यादी ऐश्वर्या कृष्णा लेंडघर यांच्या फिर्यादीनुसार ऐश्वर्या लेंडघर यांचा नोटरीचा व्यवसाय असुन त्यांचेकडे मागे सप्टेंबर 2022 मध्ये नौदलाच्या गणवेशात आलेल्या तोतया नौदल अधिकारी आकाश काशिनाथ डांगे याने फिर्यादी यांच्याकडून प्रतिज्ञापत्र बनवुन घेतले. त्यानंतर ते वारंवार फिर्यादी यांच्या कार्यालयात येऊन त्यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर लोणावळा परिसरातील तसेच त्यांच्या नातेवाईकांuना नौदलात नोकरी लावण्याची गळ घातली. एकुण 19 जणांना नौदलात विविध पदावर नोकरीस लावण्याच्या बदल्यात प्रत्येकी 3 लाख रुपये घेण्याचे ठरवुन बोलणी केली. त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या ओळखीच्या आय.एन.एस शिवाजी, लोणावळा येथील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अशा कोणत्याही प्रकारची भरती केली जात नसल्याचे समजले.
फिर्यादी यांनी आरोपीशी संपर्क साधुन आणखी एक मुलाला नोकरीस लावण्यासंदर्भात विचारणा केली असता, तो त्यासाठी लगेचच तयार झाला. यावर फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी लागलीच पोलीसांशी संपर्क साधुन आरोपी पैसे स्विकारुन नोकरीचे नियुक्ती पत्र देण्याकरीता येणार असल्याचे कळविले.यानंतर लगेचच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच आयएनएस शिवाजी लोणावळा नेव्हल पोलीस टीम यांच्या संयुक्त पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले.सदर आरोपीकडुन अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस नीरीक्षक पोवार हे करत आहेत.