अर्धवट पंचनामे करून महिना झाला , अद्यापी भरपाईचा पत्ताच नाही…
हालीवली आदिवासीवाडी व गावाला ब्लास्टिंगचा धोका , इरशालवाडी सारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? सरपंच सौ. प्रमिला बोराडे आक्रमक…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील कर्जत शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या व नागरिकांच्या गजबजलेल्या वस्तीतून रेल्वे प्रशासनाने हालीवली गावालगत डोंगर पोखरून रेल्वे मार्ग बनविण्यासाठी ब्लास्टिंगचे काम सुरू असून या कामामुळे ऐन पावसाळ्यापूर्वी आदिवासी वाडी व हालीवली ग्रामपंचायत परिसरातील अनेक घरांना , इमारतींना तडे गेलेले होते.
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे यांनी म्हणूनच ८ मे २०२३ रोजी तातडीची आमसभा घेवून होणाऱ्या नुकसानीचे व पुढील गावावर येणाऱ्या दुर्घटनेबाबत , तर ब्लास्टिंगचे कामामुळे भूगर्भात बदल घडून डोंगर खिळखिळा होत असून दरड भूस्खलन होवून आदिवासी वाडीला धोका असल्याचे ओळखून तसेच बोअरवेल चे पाणी देखील संपुष्टात येवून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनाद्वारे मा . कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांना सांगूनही , यावर कुठलीच ठोस कार्यवाही अद्यापपर्यंत न झाल्याने अखेर हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे या आक्रमक होत , ग्रामस्थांच्या सहकार्याने रेल्वे बोगद्यात होणारे ठेकेदाराचे ब्लास्टिंगचे काम बंद करून कर्जत तहसीलदार यांनी एक महिन्यापूर्वी अर्धवट झालेले पंचनामे व नुकसान भरपाई व आदिवासी वाडीला इरशालवाडी सारखी भूस्खलन होवून दरड कोसळून मानवी दुर्घटना होण्यापासून जोपर्यंत संरक्षण देत नाही , तोवर रेल्वे बोगद्याचे काम होवू देणार नाही , असा पवित्रा घेवून सर्व ग्रामस्थांनी येवून काम बंद केले.
हालीवली ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या रेल्वे बोगद्याच्या ब्लास्टिंगचे कामामुळे अनेक घरांना तडे जाऊन नुकसान झाले आहे , तर या डोंगरा लगत असलेल्या आदिवासी वाडीला नुकत्याच झालेल्या इरशाल वाडी दुर्घटना सारखी दरड कोसळून मानवी हानी होवू शकते , याची झळ येथील आदिवासी बांधवांना होवू नये , म्हणून तातडीने पाऊल उचलून कर्जत तहसीलदार यांच्या दुर्लक्षित कामामुळे या बोगद्याचे काम तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने बंद केले असून जोवर शासन – प्रशासन यावर ठोस पाऊल उचलत नाही , तोवर काम सुरू होवून देणार नाही , त्यातच ब्लास्टिंगचे कामामुळे हादरे बसून गावात खडे उडत आहेत , तर भूगर्भात देखील बदल घडत असून पाण्याचे स्तोत्र बंद झाले आहेत , त्यामुळे हालीवली गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पुढील होणाऱ्या परिणामाने गावावर अस्मानी संकट ओढवण्याची चिन्हे या सर्व बाबिमुळे दिसून येत असल्याने , हे पाऊल उचलल्याचे मत व्यक्त केले आहे.
तर ब्लॉस्टींगच्या धक्क्यामुळे घराला , अंगणवाडीला तडे गेल्याचे दिसून येत आहे , गावातल्या अनेक बोअरवेलचे पाणी गेले आहे , अर्धवट झालेले पंचनामे पूर्ण करून तहसीलदार यांनी स्वतः येवून याची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी , अन्यथा या आपल्या ढोबळ कारभारा विरोधात हालिवली ग्रामपंचायत थेट संरपच व ग्रामस्थ उपोषणास बसतील , असा इशारा देखील निवेदनात सरपंच सौ . प्रमिला बोराडे यांनी कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांना दिला आहे.