Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सदाशिव पिरगणवार यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न...

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सदाशिव पिरगणवार यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस कर्मचारी व लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सदाशिव पिरगणवार उर्फ सदामामा यांचा सेवानिवृत्ती समारंभ लोणावळ्यातील चंद्रलोक हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सदामामा यांनी तब्बल 40 वर्ष पोलीस दलात सेवा बजावत आज 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. ते एक राष्ट्रीय हॉकीपटू देखील होते.
लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, लोणावळा शहरचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर साहेब , माजी पोलीस उपनिरीक्षक दिलीप होले, सदामामा यांची पत्नी, दोन मुले, मुलगी, लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक माने साहेब व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी अनेक माजी नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच व्यावसायिक व सदामामा यांचा मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
उपस्थित मान्यवरांपैकी काही जणांनी मनोगत व्यक्त करताना सदामामा यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या.
लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी यांनी लिहिलेला व सदामामा यांचा जीवनपट उलगडून सांगणारा लेख वाचून दाखविला. दिलीप होले यांनी सदामामा यांचे लोणावळा शहरातील वाहतुक नियोजनांतील योगदान बोलून दाखविले. तसेच आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा शहरातील कुमार चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचा चौक आहे.
त्याठिकाणी सदामामा आहे म्हंटलं की मी निश्चित होत असे, कारण त्यांचा वाहतुक नियोजनातील अनुभव मी ऐकला व प्रत्यक्ष पाहिला आहे. पुणे ग्रामीण व महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव त्यांनी खेळाच्या व कामातील कर्तव्यनिष्ठतेच्या बळावर मोठे केले आहे. पोलीस दलातील त्यांचा अनुभव फार दांडगा असल्याचे ते म्हणाले.
सदामामा यांनी भावुक होऊन लोणावळ्यात मुलांसाठी स्पोर्ट अकॅडमी सुरु करण्याचा मानस बोलून दाखविला. या सेवा निवृत्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन माजी नगरसेवक व पत्रकार विशाल पाडाळे यांनी केले तर पोलीस कर्मचारी शेखर कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page