मावळ (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात रूट मार्च करण्यात आले .गणेशोत्सव उत्साह आणि आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने हे रूट मार्च करण्यात आले.
सध्या सर्वत्र गणेशोत्सव आनंदी वातावरणात सुरु आहे. गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक सजावटी आणि देखावे करण्यात आले आहेत. देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. रात्रीच्या वेळी शहरात मोठी गर्दी होते. या गर्दीत चोरी तसेच महिला छेडछाडीचे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी काळजी घेतली आहे.
खाकीचा धाक दाखवण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यासाठी रूट मार्च केले गेले.यामध्ये तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने,सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील सहभागी झाली. अनुचित प्रकार घडल्याचे निदर्शनास येताच तत्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले आहे.