मावळ (प्रतिनिधी): श्री गणेश तरुण मंडळ आणि डोळसनाथ पतसंस्था आयोजित सांघिक महिला अथर्वशीर्ष पठण संपन्न झाले.
गेले दहा वर्षे सातत्याने गणपती उत्सवाच्या निमित्ताने या दोन्ही संस्था हा अत्यंत प्रसन्न पवित्र आणि स्तुत्य असा उपक्रम यशस्वीपणे राबवत आले आहेत. बुधवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता गणेशाच्या आरतीने या समारंभाची उत्साहवर्धक सुरुवात झाली.श्री गणेशाच्या पूजेचा सन्मान डोळसनाथ पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री व सौ राहुल पारगे यांना देण्यात आला. अत्यंत स्पष्ट उच्चार आणि कर्ण मधुर स्वरात जवळजवळ 1000 महिला भगिनींनी अथर्वशीर्षाचे अकरा सहस्त्र आवर्तन संपन्न केलेत . डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष- पीएमआरडीचे नगरसेवक संतोषजी भेगडे यांनी दोन्ही संस्थेतर्फे सहभागी महिला भगिनींचे स्वागत केले.
या अत्यंत धार्मिक चित्तप्रसन्न करणाऱ्या समारंभाचे यजमान पद आम्हा उभय संस्थांना देऊन आपण आपल्या सेवेची संधी देत आहात- याबद्दल माता- भगिनींविषयी दोन्ही संस्थांतर्फे कृतज्ञता व्यक्त केली.गणेश तरुण मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्रीकांत मेडींनी प्रास्ताविकात या सहस्त्र अथर्वशीर्ष सांघिक पठणा मागील आपली भूमिका स्पष्ट केली.प्रमुख पाहुणे लेखक वक्ते डॉक्टर- शालिग्राम भंडारी यांनी उपस्थित भाविक महिलांना संबोधित करताना या पवित्र प्रसंगी दोन संकल्प सोडण्याची विनंती केली ती म्हणजे एक आपण आपल्या अंतर्मनाची हाक ऐकून- नेहमीच योग्य तो निर्णय घेत चला,दुसरी रंजल्या गांजल्यांना शक्य असेल ती मदत म्हणजे टाईम -टॅलेंट- ट्रेझर या स्वरूपात मदत देत चला.या संकल्पा मागील उद्देश डॉक्टरांनी स्वतःच्या विविध अनुभवातून स्पष्ट केला.
गणेश तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अनिलजी फाकटकर यांनी सर्व सहभागी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर प्रत्येक सहभागी महिलाना अतिशय आकर्षक उपयुक्त अशी भेटवस्तू डोळसनाथ पदसंस्थेतर्फे देऊन अत्यंत स्तुत्य अशा या समारंभाची सांगता झाली.हा समारंभ यशस्वी करण्यास डोळसनाथ पतसंस्थेचे सर्व संचालक आणि पतसंस्थेच्या व्यवस्थापिका तसलीम शिकीलकर मॅडम,मनीषा कणसे मॅडम,अतुल काकडे, शैलेश थोरवे, रुपेश गरुड, तसेच गणेश तरुण मंडळाच्या महिला वर्गांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.