भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायत हद्दीत ठेकेदार करत असलेल्या रेल्वे बोगद्याच्या ब्लास्टिंगमुळे हालीवली – किरवली ग्रामस्थ व आदिवासी वाडीला जमीनदोस्त झालेल्या इरसाल वाडी सारखी मानवी दुर्घटना होवू नये म्हणून चेतावणी देवूनहि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात व ग्रामस्थांचे घरांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी हालिवली सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे व ग्रामस्थ यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी आमरण उपोषण केले होते.
मात्र प्रशासनाने नमतेपणा घेवून आजपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास कर्जत तहसीलदार यांच्या देखरेखीखाली ठेकेदार व रेल्वे प्रशासन ” आपण चुकतोय ” हे मान्य करत अखेर ब्लास्टिंगमुळे घरांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच ग्रामस्थांना देण्याचे कबूल केले व त्यानंतरच हे उपोषण तात्पुरते स्थगित करून,झालेल्या निर्णयाला बगल दिल्यास व नुकसान भरपाई लवकरच न दिल्यास रेल्वे प्रशासन व कर्जत तहसीलदार यांच्या विरोधात पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल ,असा इशारा हालीवली ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी देवून उपोषण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोडण्यात आले.
मात्र या घटनेला दोन महिने व्हायला आले तरी ना नुकसानीची भरपाई मिळाली , ना ठेकेदाराच्या ब्लास्टिंगच्या कामात सुधारणा झाली , म्हणूनच आज दिनांक १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी हालिवली सरपंच सौ. प्रमिला बोराडे व ग्रामस्थ सुरेश बोराडे यांनी कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली , व १५ दिवसांत कुठलाच निर्णय न घेतल्यास आम्ही पुन्हा ” आमरण उपोषण ” करू , असा इशारा दिला आहे.
मनीष कुमार, असिस्टंट इंजिनीयर – प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई तसेच मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई यांनी दिलेल्या आश्वासनां नुसार हालीवली व किरवली हद्दीतील ग्रामस्थांच्या बाधीत झालेल्या घराच्या यादीवर लवकरात लवकर शासनाच्या प्रचलीत नियम व अटीशर्तीप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच उर्वरीत शिल्लक राहिलेले व भविष्यात बाधित होणारे घरांचे पंचनामे करण्यात येतील , असे कार्यकारी दंडाधिकारी तथा कर्जत तहसीलदार यांनी नमूद केलेले पत्र देण्यात आले होते . मात्र यासर्व बाबीस कलाटणी देवून अद्यापी २ महिने झाल्याने नुकसान भरपाई मिळालेली नाही.
म्हणूनच येत्या १५ दिवसांत झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यास नागरिकांना वाऱ्यावर सोडून फसवणाऱ्या रेल्वे प्रशासन व कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांच्या बेजबाबदार कामकाजा विरोधात पुन्हा ” आमरण उपोषण ” करण्यात येईल , असा संतप्त इशारा हालीवली ग्रामपंचायत सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे यांनी निवेदन देवून दिला आहे.