लोणावळा (प्रतिनिधी):मावळ तालुक्यातील प्रथम महिला रिक्षा चालक व मालक अविशा धम्मरक्षित जाधव यांची महाराष्ट्र राज्य रिक्षा पंचायत मावळ तालुका लोणावळा शहर महिला अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
ज्यावेळी महिला व मुली पुरुषांच्या बरोबरीत उभ्या राहत नव्हत्या. त्यावेळी एका तरुण मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अविशाचे वडील जेष्ठ पत्रकार धम्मरक्षित जाधव आणि आई उषाताई जाधव यांनी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्यामुळे अविशा यांना पुरुषांच्या तुलनेने काम करण्याचे पाठबळ पालकांकडून मिळाले. अविशा यांना मावळ तालुक्यातील प्रथम महिला रिक्षा चालक ही पदवी लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी दिली.
त्यांचे नेहमीच अविशा यांना सहकार्य लाभले.अविशा यांची मेहनत व प्रचंड जन संपर्क पाहता महाराष्ट्र राज्य रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य रिक्षा पंचायत मावळ तालुका लोणावळा शहर महिला अध्यक्षपदी अविशा धम्मरक्षित जाधव यांची नियुक्ती केली. त्यांच्या या नियुक्तीसाठी त्यांच्या लोणावळ्यातील मित्र परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव माननीय निखिल कवीश्वर,लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटना अध्यक्ष अमोल शेडगे, मंगेशजी बालगुडे,मनीष गवळी, इरफान शेख,सूर्यकांत औरंगे,मनसे चे लोणावळा शहर अध्यक्ष भरत चिकने, निखिल भोसले आदी जन उपस्थित होते.