Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !

कर्जतमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) हिंदूहृदय सम्राट वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख ” मा. बाळासाहेब ठाकरे ” यांच्या स्मृती दिननिमित्त आज कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने ” बाळासाहेब भवन ” येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक ऍड. संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम खान , उदय शिंदे , किशोर कदम , सचिन भोईर , प्रदीप वायकर , तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

” हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ” , हे एक धगधगते ज्वलंत अग्निकुंड होते . शतकाच्या यज्ञातून एक केशरी ज्याला उठली आणि या देशासह महाराष्ट्राला ” वाघाचे ” नेतृत्व देऊन गेले. मराठी माणसाच्या स्थाभिमानाला डिवचणारे , निखाऱ्यावरच्या राखेवर फुंकर घालून चैतन्य जागविणारे , आवाज कुणाचा, ” मुंबई आहे महाराष्ट्राची नाही कुणाच्या बापाची “, अशी सिंहगर्जना करणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे या देशाला लाभलेले आगळे वेगळे नेतृत्व .सन १९६० च्या दशकाल मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी पण पद्धतशीरपणे बहुभाषिक करून विविध कंपन्या, विमा कंपन्या, कार्पोरेट ऑफिस, सकाळच्या दुधवाल्यापासून ते रात्रीच्या पावभाजी, भेळपुरीच्या गाड्‌यांवर परप्रांतीय नागरिकांनी ताबा मिळवलेला.
नोकरीच्या ठिकाणी ” नो व्हेकेंसीचे ” बोर्ड वाचून मान खाली घालून आपल्या नशिबालाच दोष देत आत्मविश्वास हरवून बसलेला मराठी माणूस , आपले पौरुषत्वच थिजून गेलेला होता , त्याचा ताठ असलेला कणा पार मोडून गेला होता, पिचल्या कण्याचा म्हणून त्याला हिणवले जात होते, अशावेळी एक शिडशिडीत बांध्याचा एक तरूण उभा ठाकला , ” वाचा आणि थंड बसा ” अशी मार्मिक या पाक्षिकात सुरुवात करून त्याने मराठी स्वाभिमानाला डिवचले, आणि मराठी माणूस पेटून उठला . ” बजाव पुंगी – हटाव लुंगी ” अशी आरोळी ठोकत कडवट शिवसैनिक तयार केले. आपल्या ठाकरी भाषेने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आणि हा हा म्हणता ही ” वाघाची डरकाळी ” संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचली.

यंडूगुंडू चे मराठी माणसाच्या हक्कावरील आक्रमण परतवून लावण्यासाठी एका संघटनेची गरज होती. मराठी माणसाला एकाच विचारात, एकाच ध्येयात गुंतवून ठेवण्यासाठी बाळासाहेब विचार करत असता, प्रबोधनकार म्हणाले, ‘ काय रे बाळ, काय संघटना काढायचा विचार आहे काय ? बाळासाहेब म्हणाले, हो….. ” मराठी माणसाचे सत्व जपणारी संघटना काढायची आहे , नांव काय द्यायचे, तो विचार करतोय , त्यावर प्रबोधनकार म्हणाले , मी सांगतो संघटनेचे नांव…… शिवसेना……! १९ जून १९६६ रोजी शिवसेना नावाचा सूर्य अखेर शिवतीर्थावर तळपला …… जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… हे नेहमीचे परवळीचे शब्द ऐकूण समोरचा अथांग जनसागर मंत्रमुग्ध झाला. चैतन्याची एक लहर चमकून गेली, विजेचा लखलखाट , ढगांचा गडगडाट व्हावा, तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवसेनाप्रमुख झिंदाबाद , शिवसेना झिंदाबाद ! हा आवाज आजपर्यंत कोणीही रोखू शकला नाही . ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत ध्येयवेड्‌या शिवसैनिकांच्या कठोर परिश्रमातून अखंडपणे धगधगत ठेवणारे हे यज्ञकुंड आजही ज्वलंत आहे . मराठी मनाचा तारकमंत्र – मराठा रक्षणासाठी , मराठी अस्मितेसाठी, एकच लक्ष एकच विचार एकच नेतृत्व लाभलेले ” शिवसेनाप्रमुख ” यांच्या कार्याला अखेर देशाला , महाराष्ट्राला मानाने ” जय महाराष्ट्र ” करावाच लागेल.

” कदम मेन्शन ते मातोश्री ” हा त्यांचा प्रवास एक ज्वलंत चळवळच म्हणावी लागेल , ज्यांच्या कपाळी भगवा टिळा लावला अशा अनेक शिवसैनिकांचे नशीचच बाळासाहेबांनी बदलवले. त्यांच्या हयाती नंतरही मर्द मावळ्या कडवट शिवसैनिकांच्या जोरावर ” शिवसेना ” है ज्वलंत अग्निकुंड प्रखरतेने तळपत आहे . म्हणूनच १९९४ नंतर पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला . धन्य ते शिवसेनाप्रमुख व त्यांचे ज्वलंत विचार , त्यांच्या स्मृती दिनी आज त्यांना मानाचा मुजरा व जय महाराष्ट्र !
- Advertisment -

You cannot copy content of this page