ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या ” कर्जत तहसीलदार व प्रांत अधिकारी ” यांच्यावर कारवाईची मागणी…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील ” कर्जत – पनवेल रेल्वे बोगद्याच्या कामात ” ठेकेदार करत असलेल्या प्रमाणापेक्षा जादा तीव्रतेच्या स्फोटामुळे हालिवली व किरवली गावातील अनेक नागरिकांच्या घरांचे स्लॅब पडून , भिंतींना तडे जाऊन , प्लास्टर निघून व जमिनीतील पाणी आटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . झालेले नुकसान उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही नुकसान भरपाई मिळावी यासाठी हालीवली ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांना तीन वेळा आमरण उपोषण करावे लागते , तरी हि ” ढींम्म ” असलेल्या ” बुजगावणे ” कर्जत तहसीलदार व कुठल्याच प्रकरणात कधीच नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष न देणारे ” प्रांत अधिकारी ” यांनी नुकसानी संदर्भात ठेकेदाराला भरपाई देण्यासंबंधी ” वठणीवर ” आणले नसल्याने आता जिल्हाधिकारी न्याय देतात का ? म्हणून त्यांच्याकडे तक्रार अर्ज देवून आम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी व ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार व कर्जत प्रांत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने हालीवली मा. सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे.
रेल्वेच काम म्हणजे ” राजकीय वरदहस्त ” असल्यानेच कर्जत तहसीलदार व प्रांत अधिकारी ठेकेदारावर कारवाई करत नाहीत , असा आरोप देखील हालीवली मा. सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांनी केला असून आत्ता जिल्हाधिकारी अलिबाग काय कारवाई करतात ? यासाठी त्यांचे दरवाजे ठोठावले आहेत . मात्र गेली दोन वर्षे हा संघर्ष हालीवली व किरवली ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मा. सरपंच सौ. प्रमिला बोराडे करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील अद्याप पर्यंत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखविली.
अद्याप पर्यंत दोन वेळा आमरण उपोषणाला कर्जत तहसिलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रशासनाने पूर्तता करावी व कर्जतच्या पर्यावरणीय ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार , व त्यांना पाठीशी घालणारे कर्जत तहसिलदार व प्रांत अधिकारी यांची उच्च स्तरीय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन मा.सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
ते स्वीकारताना मा.उपजिल्हाधिकारी रायगड – अलिबाग यांना निवेदन दिल्यावर ताबडतोब उपजिल्हाधिकारी यांनी कर्जत तहसिलदारांना फोन लावला व ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्यावर कारवाई करून ” प्रश्न मार्गी लावा ” असे सांगितले असून आठ दिवसांत अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा या असे तोंडी आश्वासन मा. उपजिल्हाधिकारी यांनी हालीवली मा. सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांना दिले आहे . यावर आता कर्जत तहसीलदार शीतल रसाळ काय कारवाई करतात , याकडे समस्त कर्जत तालुक्याचे लक्ष लागून आहे.