Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये " वैशाख बुद्ध पौर्णिमा " मोठ्या उत्साहात साजरी !

कर्जतमध्ये ” वैशाख बुद्ध पौर्णिमा ” मोठ्या उत्साहात साजरी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे , दया – क्षमा – शांती – करुणा ची शिकवण देणारे ” तथागत भगवान गौतम बुद्ध यांची वैशाखी बुद्ध पौर्णिमा ” कर्जत तालुक्यासह कर्जत शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्ताने भारतीय घटनेचे शिल्पकार – विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात भगवान गौतम बुद्धांची प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत अभिवादन केले . यावेळी भारतीय बौद्ध महासभा, जेष्ठ नागरिक व संविधान गौरव समिती तर्फे वैशाख बुध्दपौर्णिमा निमित्त वंदना – सुत्रपठण – खिरदान व प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास बौद्ध बांधव , भगिनी , उपासक – उपासिका , बहुजन वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैशाख बुध्दपौर्णिमा निमित्त गुरुवार दि. २३ मे २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – कर्जत येथे सकाळी १० – ०० वा. ध्वजारोहण व सुत्रपठन सायं. ६ ते ८ प्रवचनकार आयु. ज्ञानेश्वर गायकवाड – वरिष्ठ केंद्रीय शिक्षक यांनी ” वैशाख पौर्णिमेचे ( बुध्दपौर्णिमा ) महत्व ” या विषयावर प्रबोधन केले . ते म्हणाले की , बुद्धांची सम्यक दृष्टी मिळवण्यासाठी ईतर सर्व दृष्टी मुक्त झाले पाहिजे , विचार – संस्कार – परंपरा या दुसऱ्यांच्या असतात , मात्र दृष्टी आपली असते , वर्तमान जीवनात कसे जगायचे ते तुम्ही ठरवा . जोवर एखाद्या गोष्टीवर विश्वास प्राप्त होत नाही , अनुमती प्राप्त होत नाही , कुठला अनुभव मिळत नाही , तोवर कुठलीच गोष्ट मानू नका , हे तथागत बुद्धांचे तत्व आहे . प्रयोग केल्याशिवाय प्रचिती येणार नाही , यावर त्यांनी प्रकाश टाकला . बुद्धांनी या जगाला नवीन ज्ञान दिले , त्यांनी जन्म व मृत्यूवर देखील विजय प्राप्त केले , २५०० हजार वर्षांपूर्वी आपल्याला धम्म दिला , आपली श्रध्दा – कृतज्ञता हि अंधश्रधा बनली म्हणूनच धम्माचा पाहिजे तसा प्रचार – प्रसार झाला नाही , असे सांगत , बाबासाहेबांनी देखील धम्माचा -हास का झाला , हा प्रश्न केला होता . तथागतांना व बाबासाहेब यांना आपण मानतो , पण जाणत नाही , अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी या कार्यक्रमास जी. बी. गायकवाड , लक्ष्मण खंडागळे , मधुकर रोकडे , बबन ओव्हाळ , विश्वास बडेकर , हरिभाऊ गायकवाड , सिध्दार्थ गायकवाड , मारुती गायकवाड , गुलाब शिंदे , बबन गायकवाड – दहिवली , डि. जगताप , बबन गायकवाड – किरवली , प्रमोद अंबोरे , शुभांगी गायकवाड , उज्ज्वला साळवी , सुवर्णा भिंगारदिवे , अंबोरे ताई , मायावती शिंदे , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने उपासक – उपासिका उपस्थित होते . शेवटी संजयजी खंडागळे व कुटुंबीय ( पोटल पाली ) यांच्या वतीने सर्वांना खिरदान करण्यात आले . तर आयोजक भारतीय बौद्ध महासभा , ज्येष्ठ नागरिक आणि संविधान गौरव समितीच्या वतीने सर्वांचे ” मंगल ” होवून आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page