खासदार आप्पा बारणे यांच्या सत्कार समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फिरवली पाठ…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आमच्या बरोबर महायुतीत राहून पाठीत खंजीर खुपसायचे काम करता , हिम्मत असेल तर राज्यातून महायुतीतून बाहेर पडा व मगच येथील आमदारकी लढविण्याची भाषा करा , असा जहरी टोला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना शेळके हॉल मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी लगावला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही येथे विकास घडवीत असताना १ हजार करोड निधी आणला , त्याचा फायदा तुमच्या गावाला देखील झाला आहे . महायुतीतील मित्र पक्ष म्हणून तुम्ही केलेला प्रचार व पडलेले मतदान संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली . पण आम्ही ही आलेले हे संकट निवारण करण्यास सक्षम असल्याचे संतप्त मत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले.
रविवार दिनांक ३० जून २०२४ रोजी शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – मनसे – आर पी आय – रासप महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे नव निर्वाचित खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा सत्कार सोहळा शेळके मंगल कार्यालय किरवली येथे ठीक ४ वाजता आयोजित केला होता . यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार महेंद्र शेठ थोरवे , खालापुरचे जिल्हा नेते पाटील , भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , भाजप जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे , मा. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , जिल्हा सचिव रमेश मुंडे , विधानसभा संघटक पाटील , आर पी आय कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , संघटक शिवराम बदे , खालापुर प्रमुख संदेश पाटील , कर्जत ता. प्रमुख संभाजी जगताप , भाजप ता. अध्यक्ष राजेश भगत , आर पी आय कर्जत ता .अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , किसान मोर्चाचे अतुल बडगुजर , पंचायत समिती मा. उप सभापती मनोहर दादा थोरवे , युवा सेना ता. प्रमुख अमर मिसाळ , मते , विजय जिंनगरे , मा. नगरसेवक संकेत भासे ,कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , सुरेखा शितोळे , संघटक नदीम भाई खान , दिनेश कडू , मनिषा दळवी , संघटीका सायली शहासने , त्याचप्रमाणे महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे पुढे म्हणाले की , विरोधकांनी निगेटिव्ह ताकद उभी करून चुकीचा प्रचार करण्यात येत होता , हीच संपूर्ण परिस्थिती देशात राज्यात व येथे मावळ मतदार संघात होती , तरीही आप्पा पुन्हा एकदा खासदार होतील असा विश्वास आम्ही महायुतीने दिला होता , हा मतदार संघ १८ हजाराने मागे पडला , सर्वांचे मनोमिलन व्हावे म्हणून समन्वय समिती स्थापन करून येथील सर्व पक्षाचे नेते एकत्र येवून काम करतील असे वाटले होते , करोडो रुपयांचा निधी मुख्यमंत्री देतात , मग महायुतीचा धर्म का पालला जात नाही , नैसर्गिक रित्या झालेली महायुती आहे , रायगडची सिट जाणार होती , पण महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून ती जागा खेचून आणली , येथील महायुती सक्षम असताना आपली पिछाडी का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत मग तुम्हाला युती मान्य नसेल तर बाहेर पडा , अशी पाठीत खंजीर खुपसायला भूमिका ठीक नाही , असा घणाघाती आरोप त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला . कर्जतमध्ये आगामी काळात विधानसभेत भगवाच फडकणार , अशी ग्वाही त्यांनी दिली . तर आलेल्या समस्या कश्या दूर करायच्या या आम्हाला माहीत आहेत , महायुतीतून बाहेर पडा मग आमच्याशी लढायची भाषा करा , असे खडे बोल त्यांनी मित्र पक्ष राष्ट्रवादीला सुनावले . ” विकासाची हॅट्रिक ” आता खासदार आप्पा बारणे यांच्या माध्यमातून पहाणार आहात , ” लाडकी बहिण ” ही भगिनी साठी योजनेतून १५०० रू. सहाय्य निधी मिळणार आहे , वर्षाला ३ सिलेंडर फ्री होणार , असे महिला सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे , असे सांगून खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सत्कार समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार संघातील एक ही नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते आले नसल्याने महायुतीत ” मनोमिलन ” आगामी काळात राहील की नाही , याची गॅरंटी दिसत नाही.