if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी – मराठवाडा विकास संघाची मागणी..
पिंपरी : ( श्रावणी कामत ) पुणे (दि. ८ जुलै २०२४) पिंपरी चिंचवड शहर व परिसरात भागीदारी मध्ये प्लॉट विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी गुंतवलेली ३४ लाख रुपयांची रक्कम आणि भागीदारी व्यवसाय करून मिळालेला २० टक्के नफा न देता आर्थिक फसवणूक केली असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड, दत्तनगर, रहाटणी येथील रहिवासी गजानन विठ्ठलराव कर्णे (वय ४१ वर्ष) यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी (दि. ५ जुलै) दाखल केली आहे अशी माहिती मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश शिवाजीराव गुंड यांनी दिली.
गजानन कर्णे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार वाकड पोलिसांनी माधव मल्लिकार्जुन मनोरे, विश्वनाथ माधव मनोरे, नागनाथ इरवंत हुडगे आणि सोमनाथ माधव मनोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ४०६, ४२० आणि ३४ नुसार तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार वरील आरोपींना ताबडतोब अटक करून न्याय द्यावा अशी मागणी गुंड यांनी केली.यावेळी फिर्यादी गजानन कर्णे उपस्थित होते. मंगळवारी (दि.८) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै २०२१ पासून त्यांनी त्यांच्या ओळखीचे माधव मनोरे यांच्यासोबत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय भागीदार म्हणून सुरू केला. त्यावेळी भागीदारी पत्रात उल्लेख केलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन करून, बँक खात्यातील पैसे परस्पर काढून घेऊन, परवानगी शिवाय कंपनीच्या पैशाने चारचाकी वाहन विकत घेऊन, कंपनीचे नावे खरेदी केलेली जमीन परस्पर स्वतःच्या नावे खरेदी करणे व विकणे अशाप्रकारे फसवणूक केली आहे.
याबाबत जाब विचारला असता माधव मनोरे यांनी ” आता तुझा विषय संपला आहे. आम्ही खरेदी दस्त केलेले आहेत. तुला काय करायचे आहे ते कर. जास्त शहाणपणा केल्यास एका प्लॉट मध्येच तुला गाडू, तुला माहिती आहे. तुझा कार्यक्रम करायला मला काहीच वेळ लागणार नाही. तुला पार्टनरशिपचा फायदा तीन-चार कोटी देण्यापेक्षा तीन, चार लाखांमध्ये तुझी सुपारी देतो तुझी बॉडी पण मिळणार नाही. मीच आता पार्टनरशिप रद्द करणार आहे. तुला कुठे जायचे तेथे जा. पोलीस माझे काही वाकडे करू शकत नाही.” अशा प्रकारे त्यांनी धमकी दिली व भागीदारी मधील व्यवहारापोटी आलेल्या रकमेतील व उर्वरित शिल्लक मिळकती मधील हिस्सा देण्यास नकार देऊन तेथून हाकलून दिले. मनोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेले धमकीमुळे मी व माझे कुटुंब भयभीत झाले असून आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावे व संबंधित आरोपींना अटक करून आम्हाला न्याय द्यावा अशीही मागणी गजानन कर्णे यांनी पत्रकार परिषदेत केली.