भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली अनेक वर्षे मी शिवसेनेत कार्यरत असून त्या माध्यमातून पक्षाला यश मिळविण्यात नेहमीच यशस्वी झालो आहे . सकल मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्याच्या लढाईत नेहमीच समन्वयक म्हणून अग्रेसर राहून लढाई लढलो असताना आता सर्व समाज बांधवांची ईच्छा असल्याने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून निवडणूक लढण्यास इच्छुक असून पक्षाने मला आदेश दिल्यास कर्जत खालापूर मतदार संघातून मी निवडणूक लढणार असल्याचे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खोपोली शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी आपले प्रभावी मत व्यक्त केले आहे . कर्जतमध्ये शिव संवाद दौ-यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात उपस्थित पत्रकारांशी बातचीत करताना ते म्हणाले.
सुनील पाटील हे खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून राहिले आहेत . नगरसेवक म्हणून ते २ वेळा निवडून आले आहेत . ते मराठा समाजाचे असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे . शिवसेना खोपोली शहर प्रमुख पद त्यांना मिळाल्यावर त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती . खोपोली नगर परिषदेत त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ११ नगरसेवक निवडून आणून ” हम भी कुछ कम नहीं ” हे दाखवून दिले होते . नंतर झालेल्या २०१४ व त्यानंतर २०१९ साली विधानसभेच्या निवडणुकीत ते इच्छुक उमेदवार असताना शिवसेना पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली नाही , शेकाप मधून शिवसेनेत आलेले महेंद्र थोरवे यांना पक्षाने उमेदवारी दिली , पण ते निराश झाले नाहीत , पक्षाने दिलेला उमेदवाराचा त्यांनी प्रचार करून खोपोली – खालापूर मधून चांगले मताधिक्य दिले होते . तर आताही महा आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा जोरदार प्रचार करून येथून आघाडी मिळवून दिली.
मराठा क्रांती मोर्चा , सकल मराठा समाज या संघटनेत रायगड जिल्हा समन्वयक म्हणून काम करत असताना पक्षात काम करताना अडचण येवू नये म्हणून मी जिल्हा प्रमुख मनोहर भोईर व जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील यांच्याकडे त्यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला असता तो त्यांनी स्वीकारला नाही . कर्जत खालापूर मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे . या मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून मी सातत्याने दोन वेळा मागणी केली आहे . शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात असलेले सर्व सकल मराठा समाज बांधवांच्या मागणीनुसार व मी या मतदार संघातून शिवसेनेत आजपर्यंत केलेल्या कार्यामुळे मला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने विधानसभेची मला उमेदवारी दिल्यास नक्कीच येथे विजयी प्राप्त होवून भगवा फडकेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजपर्यंत खोपोली शहर प्रमुख सुनील भाऊ पाटील यांनी दोन वेळा केलेल्या मागणी नुसार व सकल मराठा समाजाचा त्यांना असलेल्या पाठिंब्यामुळे तसेच त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यामुळे त्यांना उमेदवारी देतात की , काय करतात ? याचे उत्तर सध्यातरी गुलदस्त्यात बंद आहे.