खोपोली (श्रावणी कामत): एक्सप्रेस हायवे आज सकाळी एक भीषण अपघात घडला, ज्यात कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून धडकल्याने एक व्यक्ती जागीच मृत्युमुखी पडला.
अपघाताची तीव्रता इतकी होती की टेम्पोने क्षणातच पेट घेतला, ज्यामुळे मदत कार्य करताना खूप अडचणी येत होत्या. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा दलांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे मृत चालकाचे शव बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत आणखी एक जण जखमी झाला असून त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, पनवेल येथे रवाना केले आहे.
मदत कार्यात देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, खोपोली नगर पालिका फायर ब्रिगेड, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स, आणि सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला. हे सर्व खोपोली पोलीस स्टेशन आणि महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा – बोरघाट यांच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य पूर्ण करण्यात आले.
अपघात महामार्गाच्या शेवटच्या लेनवर झाल्यामुळे वाहतुकीला कोणतीच अडचण आली नव्हती. बाधित वाहने बाजूला काढून महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा पूर्णपणे खुला करण्यात आला आहे.