भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) जम्बुद्विपातील मातीच्या कणाकणात ” बौद्ध संस्कृती ” रुजलेली असुन ह्या बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा , सामाजिक उत्सव, धार्मिक उत्सवाच्या व सणांच्या रुपात , तर मोठ्या प्रमाणात शीलालेख , स्तुप , विहारांच्या प्राचीन अवशेषातुन आणि ऐतिहासिक ” पाली त्रिपिटक ” ह्या पवित्र साहित्याच्या संदर्भाने जगाच्या क्षितिजावर पुन्हा – पुन्हा प्रकाशमान होत आहेत. ज्या लोकांना ह्या जम्बुद्विपात बौद्ध संस्कृतीचा उच्च प्रभाव जनमानसावर होता हे मान्य नाही , ते लोक इथले उत्सव , संस्कार , पुजा स्थाने , बौद्ध धम्माचेच आहे , हे मान्य करीत नाहीत. त्यापैकी एक ” दिपावली ” हा महाउत्सव बौद्ध धम्मीय असुन सुद्धा पालि साहीत्य , बौद्ध संस्कृतीचा अभ्यास नसलेले लोक दिपावली बौद्धांनी साजरा करु नये , असे संदर्भहीन , तर्कहीन , बुद्धीहीन पुर्वग्रह दुषीत विचार मांडुन बौद्ध संस्कृतीचा दरवर्षी विरोध करीत आलेत , मात्र त्यांची विरोधाची धार आता श्रद्धावान पालि अभ्यासकांनी बोथट केली असून त्यांच्या दिपावली विरोधाला बौद्ध जनतेने नाकारलेले दिसत आहे . याच पाली साहित्याचा आधार घेत कर्जत तालुक्यातील हालिवली येथे ” मैत्रेय सोशल वेल्फेअर फाउंडेशन – हालिवली ” च्या वतीने ” दिपोत्सव ” मोठ्या उत्साहात अध्यक्ष अंकुश सुरवसे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.
यावेळी प्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले , व उपस्थित धम्म बांधव व महिला भगिनी यांनी दिप प्रज्वलित करून अभिवादन केले . यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष अंकुश सुरवसे यांनी इतिहास मांडताना म्हणाले की , ह्या जम्बुद्विपात महान सम्राट , सम्राट अशोक यांनी ” चौऱ्यांशी हजार ” विहारे स्तुप यांच्या उद्घाटनाचा ” महाउत्सव ” दिवे लावून पुष्पमाला अलंकारांनी विहारे स्तुप सजवुन साजरा केला. तो दिवस कितीतरी आनंददायी आहे , बौद्ध धम्माच्या इतिहासात बुद्ध पौर्णिमा वगळता इतका महान पवित्र दिवस अन्य असु शकत नाही.
त्या महोत्सवाच्या निमित्तानं दिपकांच्या ओळींच्या ओळी लावल्यामुळे त्यास दिवाओळी म्हणजेच ” दिपावली ” असे नामाभिदान काळाच्या ओघात प्राप्त झाले . बौद्ध धम्म हळुहळू इथल्या जनतेच्या वाणीतुन , साहित्यातुन बाजुला झाला , त्रिपीटक पालि साहीत्य मात्र इतर बौद्ध राष्ट्रात सुरक्षीत राहीले , परंतु भुमी तीच , जनता तीच , संस्कृती तीच , काही प्रमाणात वैदीक संस्कृती ची भेसळ करुन आधीच तयार असलेल्या सर्व परंपरांचे , उत्सवांचे , जनतेचे , हळुहळू वेगळ्या संस्कृतीत नामकरण झाल्याने दिव्यांशी संबंधित असलेला जम्बुद्विपातील भारतीय जनतेच्या ह्या महाउत्सवाच्या पाऊलखुणा ” दिपावली ” शिवाय अन्यत्र कुठल्याही सन उत्सवात आढळून येत नाही , अश्विन अमावश्येला विहारे – स्तुप – घरे – दारे , यावर दिवे लावून ” धम्माचा प्रकाश ” आसमंतात फैलवावा , असे महान सम्राट अशोक यांचे महान कार्य आज मैत्रेय सोशल वेल्फेअर फाउंडेशन प्रत्यक्षात उतरवित असल्याचे मत मैत्रेय सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंकुश सुरवसे यांनी व्यक्त केले.
यावेळी या दीपोत्सवात मैत्रेय सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंकुश सुरवसे , सचिव व प्रवक्ते शशिकांत उबाळे , कार्याध्यक्ष संतोष सुरवसे , पॅंथर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव , संघटक संकल्प निकम , ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र रणदिवे , विजय कांबळे , राम सुरवसे व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .