लोणावळा : ॲडवोकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये विज्ञान, चित्रकला, इतिहास, कम्प्युटर आदी विषयांवर आधारित मॉडेल्स, चित्र प्रदर्शन आणि विज्ञान विषयक रांगोळी प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
प्रदर्शनाचे उद्घाटन नारायण भार्गव ग्रुपचे सर्वेसर्वा श्री. नारायण भार्गव आणि विद्यानिकेतन ट्रस्टचे अध्यक्ष ॲडवोकेट माधवराव भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. राधिका भोंडे, कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे डॉ. संजय पुजारी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले, पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक आणि शशिकला तिकोणे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील मॉडेल्स, किल्ल्यांच्या प्रतिकृती, विज्ञान प्रयोगांचे मॉडेल्स, तसेच गणित आणि कम्प्युटरविषयक प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत असल्याचे संस्थेच्या सचिव सौ. राधिका भोंडे यांनी सांगितले.
या प्रसंगी श्री. नारायण भार्गव आणि ॲडवोकेट माधवराव भोंडे यांनी प्रदर्शनातील प्रतिकृती आणि विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची प्रशंसा करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. पालकांनी आपल्या पाल्याला अशा प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत राधिका भोंडे यांनी व्यक्त केले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या कला, विज्ञान, इतिहास, गणित आणि कम्प्युटर विभागातील शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.