लोणावळा : मावळातील दोन बारवर मध्यरात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची धडक कारवाई. सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कर्तव्यावर पुन्हा रुजू होताच कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. याअंतर्गत शुक्रवार (दि. 10) मध्यरात्री लोणावळा उपविभागात दीपा बार अँड रेस्टॉरंट (कामशेत) आणि फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट (वडगाव मावळ) या दोन ठिकाणी धडक कारवाई करत रात्रीच्या वेळेत अतिरेकी व्यवहार उघडकीस आणला.
कारवाईदरम्यान दोन्ही बारमध्ये विहित वेळेपेक्षा जास्त काळ व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. ग्राहकांना अन्नपदार्थ व मद्यविक्री सुरू होती, तसेच वाद्य आणि ऑर्केस्ट्राची सुविधा चालू होती. यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बार चालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 223 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 33 (डब्ल्यू) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान बारमधील कर्मचाऱ्यांकडे परवाने, वेळेची अट आणि इतर नियमांचे उल्लंघन याची तपासणी करण्यात आली.
संबंधित प्रकरणांमध्ये कामशेत पोलीस ठाणे आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर वचक बसला आहे.सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच विविध कारवायांद्वारे कायद्याचा अंमल सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे. बार चालकांनी नियमांचे पालन करावे आणि कायद्याचे उल्लंघन टाळावे, असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला.
या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे शांतता भंग होण्याबरोबरच समाजात गैरवर्तनाला खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेचे कौतुक होत आहे.