लोणावळा: जगभर मराठी भाषेचा विस्तार दहाव्या क्रमांकावर असून, भारतासह परदेशातही मराठी बोलणाऱ्या लोकांचा मोठा समुदाय आहे. भाषा कधीही मरत नसते; ती नेहमी नव्या रूपात आपल्यासमोर येत असते. मराठीला दोन हजार चारशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. मराठी कोशवाङ्मय हे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारतात चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मराठी साहित्यातील वैशिष्ट्य म्हणजे सणानिमित्त प्रकाशित होणारे दिवाळी अंक, ज्यामुळे महाराष्ट्राने आपली सांस्कृतिक ओळख जगभर पसरवली आहे, असे प्रतिपादन भिगवण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी केले.
लोणावळ्यातील एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य, आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
डॉ. वाळुंज म्हणाले, “व्यक्तिमत्त्व विकासात मातृभाषेचे योगदान अनमोल आहे. मातृभाषा भक्कम असेल, तर इतर अनेक भाषांचे ज्ञान सहज प्राप्त होऊ शकते. मातृभाषेच्या अभ्यासामुळे वैचारिक, मानसिक आणि भावनिक क्षमता विकसित होते. सतत वाचनामुळे मनुष्य विचारांच्या कोंडीतून मार्ग शोधू शकतो. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासात भाषिक कौशल्यांची महत्त्वाची भूमिका आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख म्हणाले, “भाषेचा उगम मानवाच्या उत्क्रांतीसह झाला आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो. मानसशास्त्रात व्यक्तिमत्त्व या घटकावर व्यापक संशोधन झाले आहे. मनुष्याचा मेंदूचा डावा गोलार्ध भाषेशी संबंधित असल्याने, भाषा शिकणे आणि तिचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक ठरतो.”
मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे यांनी प्रास्ताविकात मराठी भाषा संवर्धनासाठी महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “ग्रंथ दिंडी, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, मराठी स्वाक्षरी मोहीम, सामूहिक वाचन, आणि ‘मराठी वाचन कट्टा’ यांसारखे उपक्रम विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम वर्ष पदवी वर्गातील कु. सायली धुमाळ, कु. आरती दळवी, कु. वैष्णवी साबळे आणि कु. अरुणा गोपाळे यांनी ‘हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे’ हे गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. संदीप खाडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील वाघ यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. धनराज पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.