![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या विटंबनेच्या निषेधार्थ लोणावळ्यात सर्वपक्षीय मोर्चा..
लोणावळा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची आणि भारतीय संविधानाची वारंवार करण्यात येणारी विटंबना तसेच परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. 30 जानेवारी रोजी लोणावळा शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून देशभरात संविधानाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. परभणीमध्ये नुकतीच संविधानाची जाहीर विटंबना करण्यात आली. त्याचबरोबर, परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत झालेल्या गंभीर मारहाणीमुळे मृत्यू झाला. या घटनेला दीड महिना उलटूनही दोषींवर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.
या प्रकरणात संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळणार की नाही, असा सवाल बहुजन समाजाने उपस्थित केला. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा तसेच नुकतेच अमृतसर येथे आंबेडकर पुतळ्याच्या विटंबनेचाही या मोर्चादरम्यान तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात विविध आंबेडकरी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि बहुजन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. मोर्चादरम्यान, संविधान बचाव, बहुजन एकजूट, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील हल्ले थांबवा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित नेत्यांनी संविधानावर आणि आंबेडकरी विचारधारेवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत, या घटनांवर सरकारने त्वरित कठोर पावले उचलली नाहीत, तर आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला. संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी हा लढा सुरूच राहील, असे यावेळी ठामपणे सांगण्यात आले.