Wednesday, February 5, 2025
Homeपुणेमावळमावळ तालुक्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घरकुल योजना मिळाली पाहिजे – आमदार सुनील...

मावळ तालुक्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घरकुल योजना मिळाली पाहिजे – आमदार सुनील शेळके..

आदिवासी बांधवांचे कागदपत्रे त्वरित तयार करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना..

प्रतिनिधी : श्रावणी कामत
मावळ : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद अभियानांतर्गत पवन मावळ भागातील चावसर, मोरवे आणि तुंग गावांना भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीदरम्यान या गावांना भेट देता आली नव्हती, तरीही ग्रामस्थांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम आणि विश्वास दाखवला, याबद्दल आमदार शेळके यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
या दौऱ्यात ग्रामस्थांनी रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना आणि स्वस्त धान्य यांसह विविध समस्यांची माहिती आमदार शेळके यांना दिली. विशेषतः या भागात मोठ्या प्रमाणावर राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी निवाऱ्याची टंचाई गंभीर असल्याचे निदर्शनास आले. अनेक आदिवासी कुटुंबांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना घरकुल योजना मिळू शकत नाही. त्यामुळे अन्नपुरवठा विभागामार्फत विशेष कॅम्प आयोजित करून आदिवासी बांधवांची कागदपत्रे त्वरित तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
चावसरमधील विठ्ठलवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे समोर आले. पाण्याची टाकी उभारण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, आमदार शेळके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताच एका शेतकऱ्याने जागा उपलब्ध करून दिली, त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागला.
दौरादरम्यान काही ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट असल्याचे लक्षात येताच, संबंधित ठेकेदाराला तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे तसेच महसूल, विद्युत, वन, अन्नपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पंचायत समितीतील अधिकारी उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांनीही या संवादात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page