Wednesday, February 5, 2025
Homeपुणेलोणावळ्याच्या रावी ठाकूरला ‘ज्युनियर प्रिन्सेस ऑफ खोपोली’चा किताब..

लोणावळ्याच्या रावी ठाकूरला ‘ज्युनियर प्रिन्सेस ऑफ खोपोली’चा किताब..

कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती..

खोपोली : सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनतर्फे आयोजित युथ नाईट सौंदर्य सेलिब्रिटी स्पर्धेत लोणावळ्याची १० वर्षीय रावी अजय ठाकूर हिने ‘ज्युनियर प्रिन्सेस ऑफ खोपोली’ हा किताब पटकावला. या स्पर्धेत एकूण २५ लहानग्यांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर रावीने ‘ज्युनियर प्रिन्सेस ऑफ खोपोली’चा मान पटकावला.
रावी ठाकूर केवळ या स्पर्धेची विजेती नसून, ती एक बहुप्रतिभाशाली मुलगी आहे. तिच्यात आत्मविश्वास आणि उत्तम व्यक्तिमत्त्व असून, तिच्या सादरीकरणाने तिने आपली वेगळी छाप पाडली. तिच्या या यशामुळे लोणावळ्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, जुबेरने ‘प्रिन्स ऑफ खोपोली’ हा किताब जिंकत आपले दमदार व्यक्तिमत्त्व सिद्ध केले. या दोन्ही युवा विजेत्यांच्या यशाने खोपोली आणि लोणावळ्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
खोपोलीतील जनता विद्यालय येथे १ फेब्रुवारी रोजी झालेल्या युथ नाईट कार्यक्रमात सौंदर्य, सेलिब्रिटी आणि मनोरंजन यांचा मिलाफ पाहायला मिळाला. प्रकाशझोतात न्हालेल्या या सोहळ्याला खोपोलीकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. स्पर्धकांनी स्टायलिश पोशाख परिधान करत ‘ज्युनियर प्रिन्स’, ‘ज्युनियर प्रिन्सेस’, ‘प्रिन्स ऑफ खोपोली’, ‘प्रिन्सेस ऑफ खोपोली’ आणि ‘क्वीन ऑफ खोपोली’ या गटांमध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजक सुधाकर भाऊ घारे यांनी समाजातील विविध स्तरांतील सहभाग वाढावा, यासाठी असे उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. सामाजिक बळ एकवटून सकारात्मक उपक्रम घडविण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अभिनय सावंत आणि अभिनेत्री स्मिता गोंडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावत तरुणाईला प्रोत्साहन दिले.
यशस्वी आयोजनासाठी सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनचे निलेश औटी, स्वेला तुषार अहिर, दर्शन अहिर, नारायणी अमोल केदारी, नवीन देशमुख, वकर राजपूत, निखिल ढोले, रवी घारे, अंकित मोरे, कोरिओग्राफर जयेश पाटील, क्रीएशन डान्स स्टुडिओचे फाउंडर हेमंत लोटे तसेच तरुण कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
- Advertisment -

You cannot copy content of this page