Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना घेराव " कर्जत शहर बचाव समितीची बैठक...

” मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना घेराव ” कर्जत शहर बचाव समितीची बैठक पार !

समस्यांचा तिढा न सुटल्यास ” तीव्र आंदोलनाचा ” इशारा…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” हातभर समस्यांना – बोटभर उपाय ” असताना नियोजनाचा ” अभाव ” असल्याने शेकडो कर्मचारी सेवेत असताना देखील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या दैनंदिन समस्या सुटत नसल्याने कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील विविध समस्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या ” कर्जत शहर बचाव समितीने ” सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी कर्जत नगरपरिषदेच्या नव्याने नियुक्त झालेले ” मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ” यांना घेराव घातला . यावेळी स्थानिक समस्या मांडत त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून हा समस्यांचा तिढा न सुटल्यास ” तीव्र आंदोलन ” छेडण्याचा संतप्त इशारा यावेळी समितीच्या वतीने ऍड. कैलास मोरे यांनी दिला.

झालेल्या या विशेष सभेत नगर परिषदेचे अभियंता रवी लाड , उपअभियंता मनीष गायकवाड , यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते . समितीच्या वतीने ॲड. कैलास मोरे यांनी मुख्याधिकारी चव्हाण यांचे स्वागत करत निवेदनातील समस्या सविस्तरपणे मांडल्या. बैठकीत बाजारपेठेतील अस्ताव्यस्त वाहतूक , धोकादायक वाढलेले भटके कुत्रे , गटार व रस्त्यांची कामे , पाणी व वीजपुरवठा , कर्मचारी निष्काळजीपणा , यासारख्या विविध प्रश्नांवर नागरिकांनी रोखठोक भूमिका मांडली. याप्रसंगी दिपक बेहेरे यांनी बाजारपेठेतील अडचणी सांगत अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला दिला. विजय हरिश्चंद्रे यांनी भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. अजय वर्धावे यांनी धापया मंदिर परिसरातील रेंगाळलेली कामे व स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. भाऊ खानविलकर यांनी मुख्याधिकारींना कोणत्याही राजकीय दबावाखाली काम न करण्याचा सल्ला दिला. माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी नगरपरिषद कारभारावर टीका केली. सोमनाथ पालकर यांनी अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची मागणी केली. कृष्णा घाडगे यांनी पाणी व वीज समस्यांवर संताप व्यक्त केला.

यावेळी शहरातील मांडलेल्या समस्या प्रशासनाशी सुसंवाद साधून सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांवर प्रत्यक्ष उतरून मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करीन , असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिले . तर मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना शहरी समस्येबाबत निवेदन दिले आहे. समितीने एक महिन्याची मुदत दिली असून, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास , समस्येचा तिढा न सुटल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असे ॲड. कैलास मोरे , कर्जत शहर बचाव समिती यांनी ईशारा पालिकेस दिला आहे . याप्रसंगी समितीचे मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page