Thursday, June 19, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यात एसटी ने अनेकांचे " जीवन " घडविले - आमदार महेंद्र...

कर्जत तालुक्यात एसटी ने अनेकांचे ” जीवन ” घडविले – आमदार महेंद्र शेठ थोरवे..

” पाच नवीन एसटी बसेस कर्जत आगारात दाखल “

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात पूर्वी एसटी म्हणजे अनेकांची जीवन वाहिनी होती . एसटी ही केवळ प्रवासाची सुविधा नसून, ती सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेली आहे . शेतकरी – विद्यार्थी – महिला – वयोवृद्ध – कामगार आणि वारकरी यांच्यासाठी एसटी ही जीवनरेषा आहे. याच एसटी ने अनेकांचे ” जीवन ” घडविले असल्याचे प्रांजळ मत कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी व्यक्त केले , ते शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी कर्जत एसटी डेपोत नव्या एसटी बसेस लोकार्पण सोहळ्यात बोलत होते . कर्जत परिसरात एसटी ची सेवा अधिक सुलभ आणि वेळेवर मिळावी , यासाठी वेळोवेळी शासन आणि एसटी महामंडळाशी पाठपुरावा त्यांनी केला होता. त्या पाठपुराव्याचे फलित म्हणजे आज या पाच नव्या बस प्रत्यक्ष कर्जत आगारात दाखल झाल्या.कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाच नवीन एसटी बसेस चा लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


या बसेस कर्जत , पनवेल , खोपोली , शहापूर , वाशी , तुळजापूर या परिसरात नियमितपणे धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना अधिक विश्वासार्ह व नियमित सेवा मिळणार आहे. या उपक्रमात एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. भरत शेठ गोगावले आणि परिवहन मंत्री नामदार मा. प्रतापराव सरनाईक यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे आमदार थोरवे यांनी याप्रसंगी नमूद केले.


जुन्या आठवणींना उजाळा देताना आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , मी लहानपणापासून कर्जतचा एसटी स्टँड पाहतो आहे , मात्र आजही त्याच स्वरूपात आहे. आता या आगाराचे नूतनीकरण करून ” आधुनिक स्वरूप ” देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन स्वच्छतागृहे तत्काळ बांधण्यात येतील आणि आगाराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर करून अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, तर यावेळी आमदार थोरवे यांनी प्रत्यक्ष नव्या एसटी बसमधून प्रवासाचा अनुभव घेतला. “१५–२० वर्षांनंतर पुन्हा एकदा लालपरीत बसण्याचा अनुभव मिळाला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


या उत्साह समारंभात विभाग नियंत्रक श्री. दीपक घोडे, आगार व्यवस्थापक देवानंद मोरे, वाहतूक निरीक्षक दीपक देशमुख, सहाय्यक निरीक्षक महादेव पालवे, लेखाधिकारी अंकुश राठोड, अभिषेक सुर्वे, रोहित विचारे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. सुनील जंगम यांनी विधिवत पूजन करून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले.


कार्यक्रमात विद्यार्थिनी सायली भोसले हिने आमदार थोरवे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, “आज आमदार साहेबांच्या प्रयत्नातून कर्जतचा कायापालट होत आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार, श्री विठ्ठल मूर्ती, छत्रपती संभाजी महाराज स्मारक अशा विविध उपक्रमांमुळे कर्जतचं वैभव वाढलं आहे.” असे सांगितले . यावेळी किशोर कदम, दर्शन वायकर, गणेश देशमुख, हरिश्चंद्र छत्तीसकर, नागेश भरकले, महेंद्र साळवी, मेघा भरकले, अनुजा सुरावकर, संगीता शिरगरे, सुनीता फापाळे, मेघा कालवणकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ, एसटी कर्मचारी, चालक-वाहक आणि प्रवासी तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page