लोणावळा : मावळ तालुक्यातील तिकोनापेठ परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, ता. मावळ) याच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ५ मे ते १० मे या कालावधीत रात्रीच्या सुमारास आरोपीने आपल्या राहत्या घरात बोलावून अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ६५(१) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) अंतर्गत कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या करत आहेत. या घटनेमुळे तिकोनापेठ परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.