Saturday, June 21, 2025
Homeपुणेलोणावळाकैवल्यधाममध्ये ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..

कैवल्यधाममध्ये ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..

‘योग संगम’ उपक्रमांतर्गत विविध संस्थांमध्ये योगाभ्यास; IG सुनिल फुलारी यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन..

प्रतिनिधी : श्रावणी कामत.

लोणावळा : आयुष मंत्रालयाच्या ‘योग संगम’ उपक्रमांतर्गत लोणावळ्यातील जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, २१ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ६.३० वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संदेश दाखवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. साधक रामदास यांनी शंखनाद करून वातावरण मंगलमय केले. यानंतर दीपप्रज्वलन सोहळा कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (IPS) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कैवल्यधामचे मानद सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, प्रा. रणजीत सिंग भोगल, ब्रिगेडियर सुहास धर्माधिकारी, अ‍ॅड. मेघना पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

योगसत्राची सुरुवात शांती मंत्राने झाली. त्यानंतर योग शिक्षक नीरज सिंग आणि योग शिक्षिका पूर्वा सातकर यांनी सामान्य योग प्रोटोकॉलनुसार योगाभ्यासाचे सत्र घेतले. कार्यक्रमात कैवल्यधाम योग महाविद्यालयाचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ लोणावळा (अध्यक्ष लायन पद्मा गुप्ता, सचिव लायन नलिनी पवार, खजिनदार लायन डॉ. कविता नय्यर), पोलीस दल, पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमात सुबोध तिवारी यांनी IG सुनिल फुलारी यांचा शाल व ‘कैवल्यधाम कॉफी टेबल बुक’ देऊन सत्कार केला. कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना नुकताच “सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५” मिळाला असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. शरद भालेकर लिखित ‘योगमय पोलीस’ आणि डॉ. स्टुअर्ट रोज व स्वामी महेशानंद लिखित ‘Philosophy of Yoga’ या पुस्तकांचे प्रकाशन फुलारी यांच्या हस्ते झाले. ‘योगमय पोलीस’ हे पुस्तक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, योगाभ्यासामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मानसिक तणाव दूर होतो आणि आत्मिक समाधान मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र सिंगला यांनी केले आणि आभार प्रदर्शन सुबोध तिवारी यांनी केले. समारोप ‘ॐ पूर्णमदः’ पठणाने करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

योग दिनाचे औचित्य साधून कैवल्यधामच्या तज्ज्ञ योग शिक्षकांनी एकाच दिवशी लोणावळा व परिसरातील दहा ठिकाणी सामूहिक योगसत्रांचे आयोजन केले. या ठिकाणांमध्ये देहूरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरी, द ग्रेट ईस्टर्न अकॅडमी (नेव्हल कॅडेट्स), एल अँड टी ट्रेनिंग सेंटर, पोलीस ट्रेनिंग स्कूल (खंडाळा), आयएनएस शिवाजी (नेव्हल बेस), कैवल्य विद्या निकेतन शाळा, टाटा पॉवर (वलवण), खोपोली पॉवर हाऊस, भिरा पॉवर हाऊस आणि फरियाज रिसॉर्ट (लोणावळा) यांचा समावेश होता. सर्व ठिकाणी नागरिकांनी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ‘योगः एक पृथ्वी, एक आरोग्य’ या थीमनुसार योगाभ्यासाच्या माध्यमातून सकारात्मकता अनुभवली.

- Advertisment -

You cannot copy content of this page