भूसंपादन, सीसीटीव्ही योजना, वाहतूक आणि शिक्षण विषयांवर घेतला आढावा..
प्रतिनिधी : श्रावणी कामत.
लोणावळा, दि. ४ ऑगस्ट (प्रतिनिधी) – लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या संथ आणि निष्क्रीय कार्यपद्धतीवर आमदार सुनील शेळके यांनी आज आढावा बैठकीत तिव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शहरातील अनेक महत्त्वाच्या नागरी समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून, नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र प्रशासन मात्र अद्याप झोपेत आहे, अशी टीका त्यांनी केली.
लोणावळा नगरपरिषदेच्या दालनात पार पडलेल्या या आढावा बैठकीत शहरातील विविध प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा झाली. भांगरवाडी उड्डाणपुलाचे काम भूसंपादनाच्या गोंधळात अडकल्यामुळे रखडले असून, प्रशासनाने यावर त्वरित पावले उचलावीत अशी मागणी आमदारांनी केली. तसेच, शहरात सीसीटीव्ही बसवण्याच्या योजनेचा प्राथमिक प्रकल्प अहवाल (DPR) अद्याप तयार झालेला नसल्याने सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयावरही आमदारांनी रोष व्यक्त केला. खंडाळा परिसरात नवीन शाळा उभारण्यासाठी प्रशासनात सहमती असूनही, काही स्थानिक लोक राजकारणासाठी भूसंपादनास अडथळा निर्माण करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “विद्यार्थ्यांचे नुकसान ही क्षम्य बाब नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या प्रकारास समाजविघातक ठरवले.
नगरपरिषद प्रशासनाच्या एकंदर कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आमदार शेळके यांनी जाहीर केले की, येत्या १ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर किंवा मोकळ्या मैदानात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसमवेत सभा घेऊन शहरातील रखडलेल्या कामांचा थेट जाब विचारण्यात येईल.
शहरात अलीकडच्या काळात वाढत असलेली चोरी, गुटखा विक्री, अंमली पदार्थांचे प्रमाण आणि इतर अवैध धंद्यांविषयीही चिंता व्यक्त करत आमदार शेळके यांनी पोलिस प्रशासनाने गस्त वाढवून कारवाईस गती द्यावी, अशी सूचना केली.
वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच ५० ट्रॅफिक वॉर्डन्सची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसिलदार विक्रम देशमुख, पोलीस निरीक्षक राहुल लाड, नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे, तसेच विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत शेवटी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “प्रशासन जर वेळेवर काम करत नसेल, तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू. ही लढाई लोकांच्या हक्कांसाठी आहे आणि त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”