Sunday, December 22, 2024
Homeपुणेमावळधनगर आरक्षणासाठी मावळात मल्हार सेनेचे अर्ध जलसमाधी आंदोलन...

धनगर आरक्षणासाठी मावळात मल्हार सेनेचे अर्ध जलसमाधी आंदोलन…

प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे

पिवळा झेंडा फडकला धनगर समाज भडकला अशी घोषणा देत मल्हार सेना मावळ तालुका यांच्या वतीने आज तळेगाव दाभाडे येथे अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
धनगड आणि धनगर हे एकच असल्याने याबाबत घटनेत दुरुस्ती करावी व धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करावे, मेंढपाळांवर होणारे हल्ले थांबावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच धनगर समाजाने सनदशीर आणि लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास यापुढील काळातील सर्व निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मल्हार सेना मावळ आणि समस्त धनगर समाज मावळ तालुका यांच्या वतीने तळेगावातील तळे शंकराच्या मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी धनगर समाजाने गुडघाभर पाण्यात उभे राहून हे अर्ध जलसमाधी आंदोलन केले. मल्हार सेनेचे संस्थापक सरसेनापती लहुजी शेवाळे व महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण कृती समितीला पाठिंबा देण्यासाठी मल्हार सेना मावळ तालुक्याचे अध्यक्ष रामजी कोळेकर, रवींद्र कोकाटे, बापुसाहेब गुंजाळ, रंगनाथ कुलाळ, दर्शन गुंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील ओबीसी आणि राज्यातील एनटीच्या मध्यात फसलेल्या धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनाही आरक्षण द्यावे. या अर्ध जलसमाधी आंदोलनाची योग्य दखल घेतली न गेल्यास यापुढे जलसमाधी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दर्शन गुंड यांनी दिला तर धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर आगामी सर्व निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा इशारा ज्येष्ठ कामगार नेते सतीश पारखे यांनी दिला.
यावेळी रामजी कोळेकर, रवींद्र कोकाटे, प्रा.मोहन कडू, विजय सरक यांनी धनगर समाज्याच्या व्यथा मांडल्या. उपस्थित धनगर समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यामाता होळकर यांचा जयजयकार करीत घोषणा दिल्या. तर संघटनेचे अशोक माने, जयवंत शेळके, गौरव कोकाटे, हभप बापूसाहेब गुंजाळ, अमोल ठोंबरे, विक्रांत गोवेकर, बाबूराव शेडगे यांची भाषणे झाली. दर्शन गुंड यांनी या आंदोलनाचे सूत्रसंचालन केले तर रविंद्र कोकाटे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page