महिलांच्या
भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे –
एक स्त्री शिकली तर संपुर्ण कुटुंब सुधारते यासाठी महिलांना शिक्षणाचे महत्त्व व त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपणही आधाराचा हात पुढे करून या समाजाचे देणे आहोत , ही विचारधारा मनात अंगीकारून ” जिजाऊंची लेक ” बनून महिलांना आर्थिक मजबुती प्रवाहाकडे आणण्यास अहोरात्र प्रयत्न करण्याचा मानस राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.पूजा सुर्वे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपले विचार प्रकट केले.
कॉलेज जीवनापासून सौ.पूजा सुर्वे महापुरुषांचे विचाराने प्रेरित होऊन रणरागिणी सारख्याच वागत .ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी प्रायव्हेट क्लासेस सुरू केले , क्लासेस घेत असतानाच त्यांनी उल्हासनगर येथे भारतीय हिंदी हायस्कूल मध्ये कॉम्प्युटर टीचर म्हणून नोकरी सुरू केली.
एल आय सी मध्ये परीक्षा देऊन एजंट झाल्या , मात्र समाजसेवेचे व्रत घेतल्याने त्यांचे कुठेच मन रमत नव्हते म्हणून थोडी आर्थिक बाजू चांगली झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या सामाजिक कार्यात उतरल्या.त्यांनी ६ जून २०१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे दिवशीच ” राजमाता जिजाऊ फाउंडेशनची ” स्थापना केली आणि या फाउंडेशन मार्फत त्या झपाट्याने कामाला लागल्या.
स्थापनेच्या दिवशीच मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन केले . उत्पन्नाचे दाखले , पॅन कार्ड , आधार कार्ड ,जातीचे दाखले , रेशन कार्ड , डोमेसाईल इत्यादी विविध ५०० पेक्षा जास्त नागरिकांना व अशिक्षित महिलांना सर्व प्रकारचे दाखल्यांचे वाटप पळसदरी – कर्जत येथे केले.त्यानंतर २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतला , त्यात जवळजवळ साडेचारशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं . ३० जुलै रोजी सर्व शाळांमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या.
गणेशोत्सवासाठी आरतीच्या पुस्तकांचे वाटप केले , त्यानंतर निराधार अपंग विधवा महिलांना संस्थे मार्फत पेन्शन योजना राबविली . पळसदरी ग्रामपंचायत मधील बेरोजगारांची नोंदणी जिजाऊ फाउंडेशन मार्फत करण्यात आली . फाउंडेशन मार्फत तीस महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना कर्ज देऊन महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केले. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त एन डी स्टुडिओ बघण्यासाठी सर्व महिलांना घेऊन गेले.
तसेच कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून स्वताच्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले . सिंधुताई सपकाळ यांचा जाहीर कार्यक्रम घेऊन त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाने महिलांना भविष्यातील घडामोडीत त्याचा फायदा झाला . पळसदरी ठाकुरवाडी शाळेत मुलांना खेळाचे साहित्य वाटप केले तसेच पूरग्रस्तांसाठी बिस्किट वाटप केले, गोरगरिबांसाठी आरोग्य शिबीर घेतले व कौटुंबिक जीवनातुन मन मोकळे होण्यासाठी महिलांची विरंगुळा सहल नेली.
कोरोना महामारीच्या काळात आदिवासी महिलांना अन्न धान्य व इतर सामानाचे वाटप केले. शिवजयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले , त्यात ५५० विद्यार्थ्यांनी ,तरुणींनी , महिलांनी भाग घेतला , छत्रपतींची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना दिली . असे एक ना अनेक प्रकारे जिजाऊ फाऊंडेशनने गोरगरीब आदिवासी महिला , नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवले .” आपले सरकार ” हे कार्यालय उघडून गरीब – गरजू – अशिक्षित महिलांना सर्व प्रकारचे दाखले काढण्यास मदत करतात . त्यांची महिलांसाठी असलेली तळमळ खरचं वाखाणण्याजोगी असून राजमाता जिजाऊं फाउंडेशनच्या माध्यमातून सौ.पूजा सुर्वे यांच्या या अनमोल कार्यास ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा.