लोणावळा दि.30: कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन करत लग्न सोहळा पार पाडत असणाऱ्या हॉटेल ग्रँड विसावाच्या मालकावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करून लग्न सोहळ्यातील कुटुंबावर एकूण 64,000 रुपयांचा दंड लोणावळा शहर पोलीसांनी वसुल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी पुणे यांनी लग्न सोहळा फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत पार पडण्याचे निर्बंध घातलेले असताना आज कोणतीही परवानगी न घेता महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी हॉटेल ग्रँड विसावाचे मालक – हेमंत मखीजा ( वय 42, रा. उल्हासनगर, ठाणे ) याच्यावर भा. द. वी. कलम 188,269 सह साथ रोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन करून लग्न सोहळा पार पाडणारे सुखेजा कुटुंब व परस्वानी ह्या दोन्ही कुटुंबावर सोहळ्यात एकूण 76 लोकांची उपस्थिती ठेवून हॉटेल मधील 38 रूम बुक केल्या प्रकरणी दोन्ही कुटुंबाकडून 50,000 रुपये दंड तसेच सोशल डिस्टंसिंग चे नियम न पाळल्यामुळे एकूण 14 जणांकडून दंडात्मक कारवाई करत 14,000 रुपये दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांनी केली आहे.