तळेगाव 3 मे – तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारादरम्यान एका नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण पैसे न दिल्याने कॉलेजने मृतदेह देण्यास नकार दिला. पैशासाठी तीन दिवस कोरोनाचा मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्याचा संतापजनक प्रकार तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेज मध्ये घडला आहे.
तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल जवळ मायमर मेडिकल कॉलेज आहे, त्यामध्ये कोरोना रुग्णांचे 200 बेड असलेले कोविड हॉस्पिटल सुरु केले आहे. इथे तीन दिवसांपूर्वी उपचार घेत असलेल्या गणेश लोके या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण हॉस्पिटलचे बील दिले नसल्यामुळे कॉलेजने मृतदेह देण्यास नकार दिला. त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरु होती. त्याच वेळेस शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे तळेगावात जनसेवा प्रतिष्ठानने सुरु केलेल्या मोफत अन्न छत्राला भेट देण्यासाठी आले होते.
तिथे गणेश लोके यांचा मुलगा खासदार बारणे यांना भेटला व कॉलेजने हॉस्पिटलचे बील भरले नाही म्हणून तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या वडिलांचा मृतदेह कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच खासदार बारणे यांनी थेट कॉलेज गाठले. तेथील पोलीस निरीक्षक शहाजी पाटील यांनाही बोलावून घेतले, त्यावेळी जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे, शहरप्रमुख दत्ता भेगडे, माजी शहरप्रमुख मुन्ना मोरे इत्यादी उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी मायमर कॉलेजच्या प्रमुख डॉ. सुचित्रा नांगरे यांच्याशी चर्चा केली आणि पैशांसाठी तीन दिवस कोरोना रुग्णाचा मृतदेह ठेवणे अतिशय चुकीचे आहे. पैशांसाठी नातेवाईकांची छळवणूक करणे, रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरणे संतापजनक असल्याचे खडेबोल खासदार बारणे यांनी सुनावले व त्यासंदर्भात जाब विचारला असता त्यानंतर कॉलेजने मृतदेह देण्याची तयारी दर्शविली. खासदार बारणे यांनी हा प्रकार मुख्यमंत्र्यांचे ओएसडी, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या कानावर घातला आहे.
केंद्र व राज्य सरकारचे कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे गोळा करण्यासाठी बाहेर फिरावे लागत आहे. कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती हलाखीची आहे. ते बाहेर फिरल्याने कोरोनाचा प्रसार होतो. केवळ पैशांसाठी मृतदेह ठेवणे हे अतिशय भयानक असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे म्हणाले, बील भरले नाही म्हणून कोरोनाचा मृतदेह चार दिवस ठेवणे अतिशय चुकीचे आहे.
मायमर कॉलेजमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आणि गंभीर आहे. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम करत आहे. दुसरीकडे हॉस्पिटलच्या लोकांनी कोरोनाच्या नावाखाली व्यवसाय चालू केला आहे. मोफत उपचाराची सुविधा असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड रुग्णालयात बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.त्यानंतर आज तळेगांवमध्ये असा प्रकार घडला. याची शासनाने दखल घ्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओएसडी सुधीर नाईक यांना फोन करून ही घटना सांगितली. स्वतः लक्ष घालून संबंधितांना सूचना द्याव्यात अशी विनंती खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केली आहे.