भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कोरोना संसर्ग महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात देखील सरकारने कडक निर्बंध लावून नागरिकांच्या रोजगारावर टाच आणली , त्यामुळे कामगार , चाकरमणी , फेरीवाले , हातगाडीवर धंदा करणारे यांना रोजगारा अभावी कठीण परिस्थितीत दिवस कंठावे लागत असतानाच कर्जतमध्ये वीज कंपनी बिले भरण्यासाठी तगादा लावत असून नागरिकांची पिळवणूक करताना दिसत आहेत . त्यातच ” पार्ट पेमेंट ” हा पर्याय वीज कंपनीच्या अधिका-यांनी बंद केला असल्याने अर्धी – मुरदी रक्कम भरून वीज सुरळीत चालू ठेवण्याचा मार्ग देखील बंद केल्याने कर्जतमध्ये नागरिकांत संताप पसरला आहे.
कोरोना काळात रेल्वे गाड्या बंद असल्याने बदलापूर ,अंबरनाथ , उल्हासनगर , विठ्ठलवाडी येथे एमआयडीसी कारखान्यात अथवा इतर ठिकाणी कामावर जाणारे चाकरमणी , कामगार व महिलावर्ग कामावर न जाता आज दोन वर्षे झाले घरी बसून आहेत.रोजगार अभावी दोन वेळेचं निटवर जेवण मिळत नसताना पर्यायाने वीज कंपनीचे वीज बिल ते भरू न शकल्याने थकीत राहिले आहे .बिलांची वसुली करताना थकीत राहिलेल्या बिलांसाठी वीज कंपनीचे अधिकारी नागरिकांची पिळवणूक करत आहेत.अजूनही कोरोना महामारीचा काळ संपलेला नसल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुरळीत झालेली नाही.
यामुळे नागरिकांत संताप पसरला आहे. कामगार वर्ग कामावर नसल्याने घरात पगार रुपी पैसे येत नाहीत त्यामुळे गाठीशी पैसेच नसल्याने तातडीने वीज बिल भरणार कसे ? हा यक्षप्रश्न नागरिकांना पडला आहे .त्यातच ” पार्ट पेमेंट ” देखील वीज कंपनीच्या अधिकारी वर्गाने बंद केल्याने नागरिकांना ” तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
थकीत वीज बिलांची रक्कम हफ्त्यांनी वसुली करावी जेणेकरून घरातील वीज पुरवठा सुरळीत राहील ,मात्र कर्जत वीज कंपनी कार्यालयाच्या बाहेरच ” पार्ट पेमेंट ” मिळणार नाही ,असा फलक लावला आहे.संपूर्ण रक्कम नागरिकांकडे नसल्याने अर्धी रक्कम भरण्याची परवानगी मागण्यासाठी गेल्यास उपकार्यकारी अभियंता देवके हे पार्ट पेमेंट देत नसल्याने नागरिक हतबल होत असताना दिसत आहेत.वीज कंपनीच्या कर्जत कार्यालयावर अनेक राजकीय पक्षांनी काढलेल्या मोर्चाच्या वेळी हफ्त्या – हफ्त्यांनी आम्ही वसुली करू ,या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन ते पाळत नसून नागरिकांची वीज कटिंग चालू केली आहे.