Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडनेरळ ग्रामपंचायतीवर अखेर भगवाच , उषा पारधी यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ..

नेरळ ग्रामपंचायतीवर अखेर भगवाच , उषा पारधी यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ..

आमदार महेंद्रशेट थोरवे पुन्हा ” हुकमी एक्क्याच्या “भूमिकेत..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
नेरळ ग्रामपंचायतीचे थेट सरपंच रावजी शिंगवा हे अल्पशा आजाराने निधन झाल्याने रिक्त झालेल्या पदावर अनुसूचित जमातीच्या उषा पारधी यांनी शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने त्यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली व अखेर नेरळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकला.


नेरळ ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे – ७ ,भाजप – ४, शेकाप – २ ,राष्ट्रवादी काँग्रेस – ३ , अपक्ष – १ असे एकूण १७ उमेदवारांचे पक्षीय बलाबल असताना शिवसेनेचा एक सदस्य फुटून आरपीआय पक्षात गेला होता.त्यामुळे शिवसेनेची संख्या कमी झाली होती.

तर राष्ट्रवादी – शेकाप – मनसे या आघाडीतील २ सदस्य शिवसेनेत गेले होते.त्यामुळे शिवसेनेचे सदस्य संख्या ८ होती . मात्र विरोधकांकडे ९ सदस्य असल्याने ही लढत खूपच अटीतटीची होणार ,अशी चर्चा सर्वत्र असताना शिवसेनेने दोनच दिवसांपूर्वी कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती पदी आपल्याकडे बहुमत असताना शेकाप ला ते दिल्याने भविष्यात मित्रता वाढावी म्हणून शेकापच्या उषा पारधी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करून शिवबंधन बांधून शिवसेनेच्या सरपंच झाल्या.

कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे हे पुन्हा एकदा ” हुकमी एक्का ” ठरले असून विरोधकांनी देखील सरपंच पदाची लावलेली फिल्डिंग त्यांच्या डावपेचा समोर फेल ठरली असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर , जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

अखेर ही पोट निवडणूक शिवसेनेने शेतकरी कामगार पक्ष – आरपीआय यांच्या सहकार्याने जिंकून नेरळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवलाच.यावेळी नवनिर्वाचित शिवसेनेचे सरपंच उषा पारधी यांचे अभिनंदन जिल्हाप्रमुख मनोहर भोईर ,जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील , आमदार महेंद्रशेट थोरवे, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , कर्जत तालुकाप्रमुख उत्तम दादा कोळंबे ,उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे आदी पदाधिकारी व इतर मान्यवर व पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page