कर्जतमध्ये मेडिकलची पाटी हिन्दीतून..
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान राखा , म्हणूनच बोलण्याची भाषा मराठी तर दुकानाच्या पाट्या देखील मराठीतूनच पाहिजे,असा मनसे सैनिकांनी ” हल्लाबोल ” केल्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी हा बदल पहाण्यास मिळाला असताना कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेतील चौकातच छत्रपतींच्या भूमीत रायगड हे नाव हिंदीत लिहिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत उपशहर अध्यक्ष राजेश साळुंके यांनी रायगड मेडिकल स्टोअर्सच्या मालकाला निवेदनाद्वारे तात्काळ मेडिकल स्टोअर्सची पाटी मराठीतून लिहिण्याची तंबी दिली आहेे.
कर्जत शहरात स्टेशन बाहेरच असलेल्या चौकातील दुबे मेंशन या इमारतीत रायगड जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे उदघाटन गेल्या महिन्यात झाले होते.या मेडिकल स्टोअर्सच्या मालकाने रायगड हे नाव हिंदीत लिहिल्याने ते ” रायगढ ” असे झाले.
महाराष्ट्राच्या भूमीत रायगड या नावात खूपच शूर – विरा सारखा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास असल्याने या राजधानीचे नाव चुकीच्या पद्धतीने टाकू नये ,असे आवाहन करून मेडिकल स्टोअर्सची पाटी मराठीतूनच लिहावी,अन्यथा मराठी भाषेचा अवमान केल्याने मनसे स्टाईलने या विरोधात आपणास सामोरे जावे लागेल ,असा ईशारा निवेदनाद्वारे देऊन तात्काळ पाटी बदलावी ,अशी तंबी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत उपशहर अध्यक्ष राजेश साळुंके यांनी मेडिकल स्टोअर्स मालकाला दिली आहे.