खोपोली (दत्तात्रय शेडगे)
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने, एन. बी. ग्रुप व निकाळजे ग्रुप पुरस्कृत, विकास ग्रुप यांच्या विशेष सहकार्याने 23 वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2021 ही सातारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 65 किलो वजनी गटांमध्ये कु. प्राची भोईर या कुस्तीपटूने ब्राँझ मेडल प्राप्त केले आहे.
कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल – खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कु.प्राची कुस्तीचा सराव करते. या स्पर्धेमध्ये सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे येथील कुस्तीपटुंचे वर्चस्व असताना कु. प्राची भोईरने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे रायगड जिल्ह्यातून कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातून राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न सुरु असताना कु. प्राचीने मिळविलेले पदक ही त्याची नांदी आहे.
त्यामुळे तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार बाळाराम पाटील, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष – सुनील पाटील, उपाध्यक्ष – संतोष जंगम,अमोल जाधव, अंकित साखरे, सचिव – जगदिश मरागजे, कार्याध्यक्ष – सुभाष घासे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते – मारुती आडकर यांनी कु.प्राची भोईर हिचे अभिनंदन केले आहे.