लोणावळा दि.2: हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर आयोजित भव्य शोभा यात्रा अगदी उत्सहात पार पडली.
या शोभा यात्रेचा शुभारंभ हुडको कॉलनी पुरंदरे ग्राउंड येथून करण्यात आला . हिंदू नववर्षाच्या निमित्त मागील काही वर्षापासून लोणावळा शहरात हिंदू समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढली जाते . मागील दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा काढण्यात आली नव्हती.
यावर्षी मात्र कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे मोठ्या जल्लोशात व उत्साहपूर्ण वातावरणात सदरची शोभायात्रा काढण्यात आली. मागील दोन दिवसांपासून शोभायात्रेची जय्यत तयारी सुरु होती. यावेळी प्रभू श्री रामांची 25 फूट उंच भव्य मूर्ती,5 फुटी राम मंदिराची प्रतिकृती व छत्रपती शिवाजी महाराजाची ज्वलंत मूर्ती व हिंदू समिती सदस्य व महिला सदस्य यांची भव्य दुचाकी रॅली पुरंदरे ग्राउंड येथून सुरु होऊन खंडाळा, तुंगार्ली, वलवण अशी यात्रा करत नांगरगाव येथील गणेश मंदिर पटांगणात शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. तसेच हिंदू धर्माचे पावित्र्य व गौरव यासंदर्भात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील सदस्य, महिला सदस्य व नागरिकांचा प्रचंड सहभाग लाभला.