पुणे : वाकड , देहूरोड , हिंजवडी परिसरात घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या . या तिन्ही घटनांमध्ये सोन्याचे दागिने , रोख रक्कम असा एकूण आठ लाख 14 हजार 714 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे . याप्रकरणी तिन्ही पोलीस ठाण्यात सोमवार ( दि . 16 ) रोजी अज्ञातांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत वाकड पोलीस ठाण्यात विवेक नथुराम जाधव ( वय 32 , रा . वाकड ) यांनी फिर्याद दिली आहे . दोन अनोळखी चोरटयांनी फिर्यादी यांच्या घरातून 99 ग्रॅम सोन्याचे दागिने , 100 ग्रॅम चांदीचे साहित्य , तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख सात हजार 714 रुपयांचा ऐवज चोरून नेला . फिर्यादी हे गावी गेले असताना हा प्रकार घडला आहे.
तर देहूरोड पोलीस ठाण्यात संभाजी दादाभाऊ काकडे ( वय 53 , रा . देहूगाव ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . शनिवारी ( दि . 14 ) रोजी दुपारी पाच ते रविवार ( दि . 15 ) रात्री आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातून 92 हजारांचे सोन्याचे दागिने , 40 हजार रोख रक्कम असा 1 लाख 32 हजारांचा ऐवज चोरून नेला . देहूरोड पोलीस तपास करीत आहेत . तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यात किशोर शालीग्राम घुले ( वय 45 , रा . सुसगाव , ता . मुळशी ) यांनी फिर्याद दिली . अज्ञात चोरट्यांनी गुरुवार ( दि . 12 ) पहाटे पाच ते शनिवार ( दि . 14 ) सकाळी सात वाजण्याच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला . घरातून 3 लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्या , चांदीचे दागिने चोरून नेले.अशा प्रकारे तीन ठिकाणी तीन घरफोडया झाल्या असून तिन्ही घटनांमध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण आठ लाख 14 हजार 714 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सदर घटनेचा तीनही पोलीस ठाणे तपास करत आहेत.